परदेशी पाहुण्यांनी जलाशय ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:55 PM2017-12-29T23:55:21+5:302017-12-29T23:55:33+5:30
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे नवेगावबांध जलाशयाकडे पक्ष्यांनी पाठ फिरविली होती. मात्र यावर्षी या जलाशयावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षी दिसून येत आहेत. राष्ट्रीय उद्यानाची भ्रमंती करायला येणाºया पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची एक पर्वणीच ठरत आहे.
हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा बºयापैकी त्यांचे आगमन झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. यावर्षी सिरेगावबांध तलावाकडे पाहुण्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर नवेगावबांध, नवनीतपूर क्र.१ चा फुटक्या तलाव व भुरसीटोला तलावात लक्षणीय वाढ झाली आहे.
विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: आॅक्टोबर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्यानाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलिया तसेच हिमालयकडून भारतात प्रवेश करतात. पूर्व विदर्भातील तलावांचा प्रदेश त्यांना अधिक सोयीचा वाटत असल्याने येथील पाणवठे, विदेशी पक्ष्यांनी दरवर्षीच ‘हाऊसफुल्ल’ असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत जलाशय, तलावांच्या काठावर अशा पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींची किलबिल वाढत होती. यात खिलात खाद्य शोधणारे डब्लिंग डक आणि पाण्यात सूर मारुन खाद्य मिळविणारे डायव्हिंग डक या दोन प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश होता. परंतु जलाशय व काठावर पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम दिसून येतो.
मासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना परदेशी पाहुणे अधिक पसंती दर्शवितात. अशा पाठवठ्यांवर थवेच्या थवे दिसतात. सायबेरियन पक्ष्यांची संख्या भरपूर असल्याचे पक्षीनिरीक्षक सांगतात. भुरसीटोला व नवनीतपूर नं. १ च्या फुटक्या तलावावार ग्रे लॅग गुज हे पक्षी मोठ्या संख्येने आहेत. फुटक्या तलावावर यावर्षी प्रथम:च आकर्षक गुलाची चोच असलेला रेड क्रेस्टेड पोचार्ड हा पक्षी मोठ्या संख्येने दिसून येत आहे.
येथील विविध पाणवठ्यांवर लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चिन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरोशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) अशा विविध प्रजातींचे पक्षी दिसून येत आहेत.
काही तलावात पक्ष्यांची शिकारही होत असल्याची चर्चा आहे. शिवाय तलावात लागून असलेल्या अतिक्रमीत शेतीमध्ये मानवी शिरकाव व मासेमारीमुळे पक्षी विचलित होत असल्याचे जाणवते.
या गोष्टी ठरताहेत पक्ष्यांसाठी धोकादायक
नवेगावबांध, गोठणगाव, सिरेगावबांध येथील तलावांवर मासेमारी केली जाते. नवेगावांध तलावात भिसकांदा मोठ्या प्रमाणावर आहे. हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या खाद्यापोटी या तलावात पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायची. परंतु तलावाच्या काठावर या भिसकांद्याचे अवैध उत्खनन होते. या उत्खननामुळे भिसकांदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या भिसकांद्याला छत्तीसगड राज्याच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने तलाव काठावरील गावकरी यांचे उत्खनन करुन विक्री करतात. नवेगावबांध तलावात आजवर पक्षी दिसत नसले तरी यावर्षी मात्र ते येथे दाखल झाले आहेत.
सिरेगावबांध, श्रृंगारबांध, इटियाडोह धरण येथे कोळी बांधव मासेमारी करतात. याचा पक्ष्यांना त्रास होतो. मानवी अधिवासामुळे त्यांची घरटी, अंडी, नष्ट होऊन प्रजननात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे अशा तलावाकडे परदेशी पाहुणे पाठ दाखवित असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. तलावाशेजारी असलेल्या शेतात ट्रॅक्टरच्या आवाजाने सुद्धा पक्षी विचलित होतात.