वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:14+5:302021-02-11T04:31:14+5:30
किसान सन्मान योजनेपासून वंचित नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...
किसान सन्मान योजनेपासून वंचित
नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाला. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा
तिरोडा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
रानडुकरांच्या हैदोसाने पिकाचे नुकसान
गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून, त्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीस समोर जाऊन ५० टक्के धानपीक वाचविले, परंतु रानडुकरांनी तेही पीक नासधूस करून जमीनदोस्त केले. रानडुक्कर मारण्यावर बंदी असल्याने दिवसेंदिवस रानडुकरांच्या संख्येत वाढ होत आहे.
अनुदानाचे वाटप करण्याची मागणी
केशोरी : गेल्या सहा-सात महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार असलेल्या लोकांना उपजीविका चालविण्यासाठी शासनाकडून संजय गांधी, श्रावण बाळ पेन्शन योजना कार्यान्वित करून दरमहा एक हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते, परंतु गेल्या सहा-सात महिन्यांपासून सदर योजनेचे अनुदान जमा न झाल्यामुळे दररोज बँकेमध्ये जाऊन अनुदान जमा झाले किंवा नाही, यासंबंधी चौकशी करीत आहेत.
धान केंद्रावर सुविधांचा अभाव
गोंदिया : जिल्ह्यातील आधारभूत धान केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची असते. त्यासाठी पणन महासंघाने बाजार समितीला पत्रही दिले आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्त्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना आपले धान उघड्यावर ठेवावे लागते.
भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त
आमगाव : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्सकिट नसल्यामुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते.
बदलत्या वातावरणाने आजार बळावले
बोंडगावदेवी : गत आठवडाभरापासून बदलत्या वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
सालेकसा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले, तरीही ते धोकादायकच आहेत.