वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:52+5:302021-04-13T04:27:52+5:30

किसान सन्मान योजनेपासून वंचित नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार ...

Forest department neglects deforestation | वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

Next

किसान सन्मान योजनेपासून वंचित

नवेगाव बांध : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा

तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

आमगाव : गोंदिया-आमगाव राज्य मार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

रानडुकरांच्या हैदोसाने पिकाचे नुकसान

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून, त्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीस समोर जाऊन ५० टक्के धानपीक वाचविलेे; परंतु रानडुकरांनी तेही पीक नासधूस करून जमीनदोस्त केले.

अनुदानाचे वाटप करण्याची मागणी

केशोरी : गेल्या सहा-सात महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्येष्ठ वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार असलेल्या लोकांना उपजीविका चालविण्यासाठी शासनाकडून संजय गांधी, श्रावण बाळ पेन्शन योजना कार्यान्वित करून दरमहा एक हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते, परंतु गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनुदान जमा झाले नाही.

धान केंद्रावर सुविधांचा अभाव

गोंदिया : जिल्ह्यातील आधारभूत धान केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची असते. त्यासाठी पणन महासंघाने बाजार समितीला पत्रही दिले आहे. मात्र असे असतानाही केंद्रांवर सुविधांचा अभाव दिसून येतो.

ग्रामीण भागात माकडांचा आतंक

पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहे. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येऊन घराचे व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.

महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा

गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र आता अनुदान जमा झालेले नाही.

नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर

गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत.

शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे

केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीजबिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

सालेकसा : अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीज प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपींमधून होत आहे. त्यामुळे मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.

परवानगी नसतानाही मनमर्जी भावाने विटांची विक्री सुरूच

बिरसी फाटा : महसूल विभागाद्वारे तालुक्यातील वीटभट्टी संचालकांना विटा तयार करून विक्री करण्याची परवानगी देण्यात येते. तरीसुद्धा विनापरवाना वीटभट्टी संचालक विटा तयार करून मनमर्जी भावाने विक्री करीत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, समाजकल्याण विभागाकडून प्राप्त घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. या संधीचा लाभ घेऊन वीटभट्टी संचालक विनापरवाना विटा तयार करून व मागणीनुसार अवैधरीत्या वाहतूक करून घरकुल लाभार्थींना ७-८ हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे सर्रास विक्री सुरू केली आहे. महसूल विभागाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असलेल्या बाबीकडे या विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

Web Title: Forest department neglects deforestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.