वन विभागाने तत्काळ आर्थिक मदत करावी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:54+5:302021-05-25T04:32:54+5:30
बाराभाटी : जवळील ग्राम बोळदे येथील रहिवासी शैलेश भय्यालाल रामटेके (३२) या तरुण बेरोजगार इसमावर तेंदुपत्ता संकलन करताना तीन ...
बाराभाटी : जवळील ग्राम बोळदे येथील रहिवासी शैलेश भय्यालाल रामटेके (३२) या तरुण बेरोजगार इसमावर तेंदुपत्ता संकलन करताना तीन अस्वलांनी प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे जखमी इसमाला वन विभागाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जखमीच्या परिवाराने केली आहे.
रविवारी (दि.२३) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेले असता तीन अस्वलांनी शैलेश रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये शैलेश रामटेके
यांच्या डाव्या खांद्यावर अस्वलाने हल्ला केला, तर खांद्याला नखाचे खोलवर वार आहेत; तसेच जीव वाचविण्याच्या नादात पळताना शैलेश झाडाला आदळल्याने त्यांच्या डाव्या पायालाही गंभीर मार लागला आहे. शैलेश सुशिक्षित बेरोजगार असून, हाताला काम नसल्याने तेंदुपत्ता संकलनावर गेले होते. संपूर्ण परिवार त्यांच्यावरच अवलंबून असल्याने वन विभागाने पाच लाख रुपयांची तत्काळ शासकीय मदत करावी, अशी मागणी रामटेके परिवाराने केली आहे.-------------------
घटना सकाळची व पंचनामा सायंकाळी
घटना पहाटे ५.३० वाजतादरम्यान जंगलात घडली. तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५.१७ मिनिटांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी वनरक्षक रीता लांजेवार, बरडे आणि दोन वनमजूर होते. यातून मात्र वन विभागाची कामातील बेजबाबदारी दिसून आली.
-----------------------------
मुलगा शैलेश हाच परिवार चालवितो. तोच जखमी आहे तर आम्हाला कोण सांभाडेल. म्हणून तत्काळ मदत पाहिजे.
- भय्यालाल राघो रामटेके (वडील)