ट्रॅक्टर अडविल्याने वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा: तीन आरोपीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:49 PM2023-01-11T23:49:41+5:302023-01-11T23:50:23+5:30
Crime News: रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.ही घटना बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.
- लोकमत न्युज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव -रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.ही घटना बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
वनरक्षक सचिन पुरुषोत्तम गावंडे व त्यांचे सहकारी कर्मचारी सचिन अभिमन मेश्राम,दीपक बुद्धू सापा व लहानू सखाराम नैताम हे बुधवारी सकाळी गस्तीवर होते.ते १०७२(ए) खोळदा बिटमधील बंध्या ते खोळदा पांदण रस्त्यावर होते.गोपीनाथ देशमुख व लक्ष्मण देशमुख यांनी रेतीचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षकांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.व वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.सुमारे एक ब्रास रेतीची चोरी केली.आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणला.
महागावचे वनरक्षक सचिन गावंडे (३३) यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी गोपीनाथ दौलत देशमुख (५५),लक्ष्मण गोपीनाथ देशमुख (३०) व रणवीर नगरधने (४०) तिन्ही रा महागाव याचेविरुद्ध कलम ३५३,३३२,१८६,३७९,३४ भादवी चा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक विलास नाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक संभाजी तागड,पोलीस हवालदार महेंद्र पुण्यप्रेडीवार तपास करीत आहेत.
रेतीचोरीत संगनमत
महागावनजीक बोरी व नकटी घाट आहे.गाढवी नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.या जागेतून रेतीचा उपसा केला जातो.येथे ६ ते ७ रेतीतस्कर आहेत.या रस्त्याने दुसऱ्या तस्कराने ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करू नये यासाठी कुंपण करून रस्ते अडविण्याचेही प्रकार केले जातात.तस्करांनी नदीकाठावर तर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे.एवढा प्रकार होत असतांनाही मंडळ निरीक्षक, तलाठी गप्प कसे ? यावरून हा सर्व प्रकार संगनमताने केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.