सारसांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी घालणार गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 09:21 PM2022-01-01T21:21:39+5:302022-01-01T21:23:11+5:30
जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल्याचे उल्लेखनीय आहे. पक्षी संस्कृती आणि त्यांच्या अधिवासावर आता वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनाकडे वन विभागाचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनासह वन विभागानेदेखील उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या परिसरात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालणार असून, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणार आहेत.
जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल्याचे उल्लेखनीय आहे. पक्षी संस्कृती आणि त्यांच्या अधिवासावर आता वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहेत. सुरक्षेसाठी वन विभागाचे पथक दिवस-रात्र व वेळोवेळी अधिवास क्षेत्रात गस्त घालत असते. जेणेकरून पक्षी सुरक्षित राहील. विशेष म्हणजे, शिकारी, विद्युत प्रवाह आणि विषारी अन्न खाल्ल्याने आतापर्यंत अनेक सारस आणि विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परसवाडा आणि झिलमिली तलावाच्या काठावर सारस पक्षी आढळतात. जे गोंदियाचे वैभव आहे. विदेशी पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून डिसेंबर महिन्यापासून झिलमिली आणि परसवाडा तलावात पोहोचतात. सारस पक्षी दिसण्यासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे दर्शन होते. तर विदेशी पक्ष्यांचेही आगमन जिल्ह्यात होत असते. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पक्षीप्रेमींसाठी हिवाळ्याचे दिवस पर्वणीचेच असतात. सध्या जिल्ह्यात सारस पक्ष्यांसह विदेशी पाहुण्या पक्ष्यांचेही आगमन झाले आहे. तेव्हा या पक्ष्यांविषयी जनजागृती मोहीम सुरू करुन पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
- एफ. आर. आझमी, वन परिक्षेत्र अधिकारी, गोंदिया
वन विभागाच्या पथकाची गस्त
- सध्या परसवाडा व झिलमिली जलाशय परिसरात सारससह परदेशी पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. मात्र, या परिसरात पक्षी असुरक्षित दिसत आहेत. पिकांवर कीटकनाशकांचा वापर पक्ष्यांसाठी घातक ठरत आहे. याला गांभीर्याने घेत प्रशासनाने पक्षी संवर्धनासाठी या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. वन विभागाच्या पथकाने गस्त सुरू केल्याचे सांगण्यात आले.