वनरक्षकांना मिळणार सरकारी बाईक
By admin | Published: August 11, 2016 12:02 AM2016-08-11T00:02:57+5:302016-08-11T00:02:57+5:30
वनांचे संरक्षण करणाऱ्या वनरक्षकांना आता वनविभागाकडून दुचाकी वाहने दिली जाणार आहेत.
६०० वाहनांची होणार खरेदी : वनसंरक्षणासाठी वनविभागाचे प्रयत्न
गोंदिया : वनांचे संरक्षण करणाऱ्या वनरक्षकांना आता वनविभागाकडून दुचाकी वाहने दिली जाणार आहेत. त्यामुळे वृक्षांची अवैध कटाई, वन्यप्राण्यांची हिंसा आदी अवैध बाबींवर आळा घालण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वनरक्षकांना ६०० शासकीय दुचाकी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
वनांचे संरक्षण करण्यासोबतच वृक्षांची अवैध कत्तल, वन्यप्राणी व पक्ष्यांच्या शिकारीवर प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने आता वनरक्षकांना पोलिसांप्रमाणेच पहारा देण्यासाठी दुचाकी वाहन मिळणार आहेत. त्यासाठी वन विभागाद्वारे ६०० दुचाकींची खरेदी केली जाणार आहे. वनरक्षक, वनपाल यांच्या पदनावातही परिवर्तन करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.
वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र व व्यवसाय असल्यावरही इतर विभागांच्या तुलनेत वन विभागाला अधिक महत्त्व दिले जात नव्हते. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री बनल्यानंतर या विभागात आमूलचूल परिवर्तनाचा शुभारंभ झालेला आहे. एवढेच नव्हे तर मुनगंटीवार यांनी वन विभागात उपक्रम क्रियान्वित करण्यासाठी निधीची तरतूदसुद्धा केली आहे. वनरक्षकांसाठी दुचाकी वाहन देण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला व त्यासाठी निधीची व्यवस्थासुद्धा करण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयानुसार वनरक्षकांसाठी शासनाने आता ब्राँडेड कंपनीच्या ६०० बाईक्सची बुकिंग केलेली आहे.
यापूर्वी वन विभागाने १८० चारचाकी वाहनांची खरेदी केली होती. त्यामुळे वन विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची कमतरता दूर झाली. आता वनरक्षकांना पहारा देण्यासाठी शासकीय दुचाकी वाहन मिळाल्यानंतर वनक्षेत्रात होणाऱ्या शिकारी व इतर अवैध कार्यांवर प्रतिबंध लावण्यात मदत मिळेल. खरेदी करण्यात आलेले दुचाकी वाहन राज्याच्या ११ वनक्षेत्रात व १६ व्याघ्र प्रकल्पात वनरक्षकांना दिल्या जातील.(प्रतिनिधी)
पदनावातही होणार बदल
वन विभागात नवनवीन बदल घडून येत आहेत. अनेक पदनावांतही परिवर्तन केले जात आहेत. वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांच्या पदनावांत परिवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता वनपालास वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षकांना नियत क्षेत्र अधिकारी व वनमजुरांना वनसेवक असे पदनाम देण्यात आले आहेत.