शिबिराला लोकचळवळीचे स्वरु प

By admin | Published: August 1, 2016 12:13 AM2016-08-01T00:13:01+5:302016-08-01T00:13:01+5:30

महाराजस्व अभियानाअंतर्गत ४० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प आहे.

The form of Lok Chalila form | शिबिराला लोकचळवळीचे स्वरु प

शिबिराला लोकचळवळीचे स्वरु प

Next

राजकुमार बडोले : गोरेगाव येथे पूर्व तयारी समाधान शिबीर
गोरेगाव : महाराजस्व अभियानाअंतर्गत ४० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असून विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गावोगावी शिबिराची माहिती देवून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
शनिवारी (दि.३०) गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, माजी आमदार हेमंत पटले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पं.स.सभापती दिलीप चौधारी, उपसभापती बबलू बिसेन, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, पं.स.सदस्य जनबंधू, डॉ.लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, रविकांत बोपचे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, गोरेगाव तालुक्यातील ३१ हजार लाभार्थ्यांनी या शिबिरातील विविध स्टॉलला भेट देवून योजनांची माहिती जाणून घेतली आहे. योजनांची माहिती गावापर्यंत पोहचविण्यासाठी या शिबिराचा उपयोग झाला आहे. यंत्रणा व लाभार्थ्यांमधील दरी कमी होण्यास या शिबिराची मदत झाली आहे. लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करु न त्यांना योजनांचा लाभ देण्यात येईल. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.
तर १ ते १५ आॅगस्ट दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पंधरवाडा साजरा करण्यात येईल असे सांगत ना. बडोले यांनी, गावातील प्रत्येक कुटुंबाला महासमाधान शिबिराच्या माध्यमातून एकातरी योजनेचा लाभ मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचे घेतलेले अर्ज परिपूर्ण भरु न येत्या पंधरवाड्यात योजनांचा लाभ मिळण्यासाठी तयार केले जातील. ज्या लाभार्थ्यांनी अर्ज घेतले नसतील अशांना हे अर्ज पोहोचिवण्यात येतील. १० आॅगस्ट पर्यंत योजनांचा लाभ मिळण्याबाबतची सर्व प्रकरणे समाधान कक्षात पोहोचली पाहिजे. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व विविध यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ मिळेल असे नियोजन करावे असेही यावेळी सांगितले.
डॉ.सूर्यवंशी यांनी, समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना योग्यप्रकारे व व्यवस्थीतपणे देण्याचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य मानून यंत्रणांनी काम करावे. दिव्यांग बांधवांना सुध्दा स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियानातून मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आ.रहांगडाले यांनी, समाधान शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्यास मदत झाली आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. शासन व प्रशासन लाभार्थ्यांच्या जवळ येऊन योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भुजबळ यांनी, हे शिबीर महासमाधान शिबिराची पूर्व तयारी आहे. लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास शिबिराचा लाभ होत आहे. डॉ.रामगावकर यांनी, वन विभागाकडून वन्य प्राण्यांकडून शेतीच्या नुकसान भरपाईपोटी मदत करण्यात येत असल्याचे सांगून वन विभागामार्फत नवेगाव-नागझरिा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगतच्या गावांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी मांडले. संचालन स्मीता आगाशे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी हरिणखेडे यांनी मानले. शिबिराला गोरेगाव तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

शेकडो लाभार्थ्यांची स्टॉलला भेट
तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थ्यांनी विविध स्टॉलला भेट देवून ज्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधित स्टॉलमधून योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज घेतले. तहसिल कार्यालय येथे महासमाधान शिबिराच्या निमित्ताने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबतचे परिपूर्ण अर्ज समाधान नियंत्रण कक्षात पूरक कागदपत्रासह १० आॅगस्ट पर्यंत आणून द्यायचे आहेत.

Web Title: The form of Lok Chalila form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.