वन्यप्राणी अवयव तस्करीप्रकरणी चार आरोपी अटकेत; मोठ्या प्रमाणात रोख आढळल्याने रॅकेटची शंका
By अंकुश गुंडावार | Published: February 27, 2023 06:11 PM2023-02-27T18:11:34+5:302023-02-27T18:13:00+5:30
आरोपींची संख्या वाढणार
देवरी (गोंदिया) : वन्यप्राणी अवयव तस्करी प्रकरणी वन व पोलिस विभागाने देवरी तालुक्यातील पालांदूर जमि. येथून एका आरोपीला रविवारी (दि.२६) अटक केली होती. दरम्यान आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांने यात आणखी चार आरोपींचा समावेश असल्याचे सांगितले. यावरुन वन विभागाने या चारही आरोपींना सोमवारी (दि.२७) अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्यामलाल धीवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणिक दारसू ताराम, अशोक गोटे सर्व, राहणार मंगेझरी व पालांदूर जमि येथील रवींद्र लक्ष्मण बोडगेवार या पाच जणांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार वन्यप्राणी अवयव तस्करी प्रकरणी २६ फेब्रुवारीला पहाटे पालंदूर जमी. येथील आरोपी रवी बोडगेवार याला पोलीस व वन विभागाने पकडून त्याच्याकडून २१ लाख ४९ हजार रुपये रोख पोत्यामध्ये भरलेले तसेच वन्य प्राण्यांचे अवयव व २२ पेटी दारू किंमत ८४ हजार रुपये जप्त केली होती. वन्यप्राणी अवयव तस्करी प्रकरणी रवी बोडगेवार याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून वन विभाग व पोलिसांनी देवरी तालुक्यातील मंगेझरी या गावातून चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून जिवंत मोर तसेच रानगव्याचे शिंग व मोरपंख हस्तगत केले आहे. अजून या प्रकरणात किती आरोपी आहेत याचा तपास नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी करीत आहेत.
वाघाच्या नखासह शिकारीचे साहित्य जप्त
आतापर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये वाघ, बिबट या वन्य प्राण्याचे दोन नग दात, नख एक नग, अस्वलाचे नखे तीन, रानडुक्कर सुळे दहा नग, चितळाचे सिंग एक नग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजरचे खवले दोन नग, ताराचे फासे, जिवंत मोर एक नग, मोराचे पीस पाच बंडल, रानगव्याचे सिंग एक नग, झाडे सुकलेले हाडे, पापडी (झाडाची साल), वीस पेटी दारू अंदाजे किंमत ८४ हजार रुपये आदी साहित्य जप्त करण्यात आले.
२१ लाख रुपयांची रोख जप्त
वन व पोलिस विभागाने आरोपीकडून वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच २१ लाख ४९ हजार चारशे चाळीस रुपये जप्त करण्यात आले आहे. अजून या प्रकरणात आणखी किती आरोपी अडकतात. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.