दरेकसा घाटावर लुटणाऱ्या चौघांना अटक, ४ लाखांचा माल जप्त
By अंकुश गुंडावार | Published: June 7, 2023 06:28 PM2023-06-07T18:28:42+5:302023-06-07T18:29:11+5:30
मारहाण करून ८१ हजार पळविले होते
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दरेकसा घाटावर ३० मे रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास गिरवर उमराव पिछोरे रा. लट्टीटोला (बाम्हणी) हे नातेवाइकांसह काटी बैल बाजारातून १७ बैल खरेदी करून एका ट्रकमध्ये भरून रायपूर (छत्तीसगड) येथे जात असताना त्यांच्या जवळून ८१ हजार रुपये रोख हिसकावून नेले. या प्रकरणातील चार आरोपींना सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ६ जून रोजी करण्यात आली आहे.
आरोपी तेजस ठाकरे, रा. मनेरी, तुलसीराम चौधरी रा. लोहारा, नीलेश ऊर्फ विक्की मेश्राम व इतर आरोपींनी दोन चारचाकी वाहनाने जाऊन दरेकसा घाट येथे गिरवर उमराव पिछोरे यांचा ट्रक अडवून लोकांना काठीने व लोखंडी पाइपने जबर मारहाण केली. त्यांच्याकडील ८१ हजार रुपये जबरीने हिसकावून नेले होते. यासंदर्भात सालेकसा पोलिसांत भादंविच्या कलम ३९७, ३९५, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सालेकसा पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी तुलसीराम दवनलाल चौधरी (३९) रा. लोहारा, ता. लांजी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश), खिलेश छोटेलाल गौतम (२५), दिवाकर ऊर्फ दीपक अरुण गौतम (२३), अमरचंद हेमराज हरिणखेडे (३०) तिन्ही रा. रामुटोला (वडगाव) ता. लांजी जि. बालाघाट (मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा सुमो एम.एच.३७ ए ३५७५ किंमत १ लाख ५० हजार, महिंद्रा झायलो एम.एच. ३१ बी.सी. ३६६४ किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकुण ४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गुन्ह्यात वापरलेले साहित्य केले जप्त
आरोपी तुलसीराम दवनलाल चौधरी (३९) रा. लोहारा, ता. लांजी, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) याने सीताराम वर्मा यांच्या जवळून जबरीने काढून घेतलेले १० हजार रुपये तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, लाकडी काठी, लोखंडी पाइप जप्त करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नायक बिसेन, पोलिस शिपाई इंगळे, पोलिस शिपाई पगरवार, विकास वेदक, महिला पोलिस शिपाई आंबाडारे, चालक पोलिस नायक अग्निहोत्री, तसेच तांत्रिक शाखेचे पोलिस हवालदार दीक्षित दमाहे यांनी केली.