चार तांबा चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:24 PM2018-01-08T23:24:30+5:302018-01-08T23:25:02+5:30

Four copper stolen | चार तांबा चोरट्यांना अटक

चार तांबा चोरट्यांना अटक

Next
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची कारवाई : खरेदी करणारा दुकानदारही अडकला

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको इंजिनमधून तांबा चोरी करणाºया चार आरोपी व तांबा खरेदी करणाऱ्या दुकानदाराला रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या १२ तासांत अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजता करण्यात आली.
शनिवारी (दि.६) रेल्वेच्या येथील लोको इलेक्ट्रीक इंजिनमधील इंजिनचे प्रेशर मेंटेन करणारे तांब्याचे तार चोरट्यांनी पळविले होते. १९ हजार २०० रूपये किंमतीचे हे तार चोरट्यांनी नगर परिषद कार्यालयासमोरील लक्ष्मी बर्तन भंडारचे रायजी नारायण जोशी (४८, रा.गणेशनगर) यांना विकले होते.
या चोरीची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून माहिती मिळविली. तसेच आपली तपासचक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत चार चोर व चोरीचा तांबा खरेदी करणाºया दुकानदारास अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला १९ हजार २०० रूपये किंमतीचा तांबा जप्त केला.
या प्रकरणातील चारही आरोपी सिंगलटोली गोंदिया येथील रहिवासी असून यात तीन बाल आरोपी तर चौथा आकाश रमेश श्रीवास (२२,रा.सिंगलटोली) हा तरूण आहे. रेल्वे संपत्ती अवैध कब्जा अधिनियमाच्या कलम ३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्याचे दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व पोलीस निरीक्षक सिंग यांनी सांगीतले.
टास्क टीमने पकडली आंतरराज्यीय चोरांची टोळी
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व उत्तरप्रदेश या राज्यांत रेल्वे प्रवासात व स्थानकांवर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रेल्वे सुरक्षा दलाच्या टास्क टीमने अटक केली. विशेष म्हणजे, सदर टोळी मागील अडीज वर्षांपासून रेल्वे प्रवासात खिसे कापणे, प्रवाशांचे मोबाईल पळविणे, तिकीट काढून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळणे व प्रवासी महिलांच्या बॅगमधून रक्कम तसेच दागिने पळविणे अशा अनेक घटना घडविण्यात सक्रीय होती. टास्क टीम मागील तीन दिवसांपासून मोबाईल ट्रॅकिंग व सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करीत होती. त्यातूनच सदर टोळी उघडकीस आली. या टोळीकडून गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाला १५० ते २०० रेल्वे प्रवासाच्या जुन्या तिकिटासुद्धा आढळल्या. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्याकडून पाच मोबाईल व नऊ हजार रूपये रोख जप्त केले. त्यांच्यावर भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीत पाच जणांचा समावेश असून ते सर्व उत्तरप्रदेशच्या बांदा येथील रहिवासी आहेत. यात रिंकू सुरेश चौरसिया (२५), इकबाल उर्फ अक्कू जहरूद्दीन (२४), सनी श्रीवास्तव (२८), शकील कुर्बान खान (३७) व वसीम नशीर जमाल (२१) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांतून अटक करण्यात आले आहे.
वर्षभरात रेल्वे संपत्ती चोरीची ६ प्रकरणे
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ मध्ये रेल्वे संपत्ती अवैध कब्जा अधिनियमांतर्गत सहा प्रकरणांची नोंद आहे. यात १३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ हजार ४७५ रूपयांच्या साहित्याची रिकव्हरी करण्यात आली आहे. तर रेल्वे अधिनियमाच्या विविध कलमान्वये ४ हजार १४८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून १४ लाख ३८ हजार ४२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२९ प्रकरणांत ४० आरोपींना अटक
गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाने प्रवासादरम्यान चोरीच्या घटना उघड करून चोरांना अटक करण्यासाठी गठित केलेल्या टास्क टीमने २०१७ मध्ये वर्षभरात २९ प्रकरणांत ४० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रवाशांच्या सामान चोरीतील तीन लाख १७ हजार ४२९ रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दारू वाहून नेण्याच्या सात प्रकरणांत १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४९ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Four copper stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.