चारशे चालक-वाहकांचा दररोज २० हजार प्रवाशांशी येतो संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:08+5:302021-02-25T04:37:08+5:30

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी बसेसची वाहतूकसुद्धा पूर्णपणे ठप्प होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ...

Four hundred drivers-carriers come in contact with 20,000 passengers every day | चारशे चालक-वाहकांचा दररोज २० हजार प्रवाशांशी येतो संपर्क

चारशे चालक-वाहकांचा दररोज २० हजार प्रवाशांशी येतो संपर्क

Next

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी बसेसची वाहतूकसुद्धा पूर्णपणे ठप्प होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्याने एसटी बसेस पूर्ववत सुरू करण्यात आल्या. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. परिणामी, काही प्रमाणात बस फेऱ्यासुद्धा कमी झाल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडूनसुद्धा काळजी घेतली जात आहे. तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याच्या सूचनासुद्धा केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा आगारातील चारशे चालक-वाहकांचा दररोज २० हजार प्रवाशांशी संपर्क येतो. गोंदिया आगाराच्या सध्या ३७५ तर तिरोडा आगाराच्या २५० वर बस फेऱ्या होत आहेत. लॉकडाऊनपूर्वी बस फेऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र लॉकडाऊनंतर यात घट झाली आहे. दररोज २० हजारांवर प्रवासी एसटी बसमधून प्रवास करतात. यापैकी काही जण नियमांचे पालनसुद्धा करतात. तर काही जण याकडे दुर्लक्ष करतात. काही बस चालक आणि वाहकसुद्धा मास्कचा वापर करण्याकडे दुुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मार्गावरील बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. बस स्थानकावर काही प्रवासी मास्क लावलेले तर काही मास्क न लावलेले आढळले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.....

लक्षणे दिसताच कोरोना चाचणी

गोंदिया आणि तिरोडा आगारात आतापर्यंत चालक आणि वाहकांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही. मात्र कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसताच अशा चालक आणि वाहकांना कोरोना चाचणी करण्यासाठी पाठविले जाते. आतापर्यंत एकही चालक किंवा वाहक कोरोनाबाधित आढळला नाही.

...

आगाराने केला मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चालक - वाहक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगाराने सर्व वाहक आणि चालकांना मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा केला. तसेच बसेसचेसुद्धा नियमित सॅनिटायझेशन केले जाते. याचा खर्चसुद्धा आगाराकडूनच केला जात आहे.

......

लांब पल्ल्याच्या बसेस नागपूरपर्यंतच

विदर्भातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अकोला, बुलडाणा, नांदेड, अमरावती, उमरखेड, माहुर, यवतमाळ या बसेस नागपूरवरूनच सोडल्या जात आहेत. या बसेसची गोंदियावरून प्रत्येकी एक फेरी होत होती.

......

प्रवासी संख्येत झाली वाढ

लॉकडाऊनंतर एसटी बसेस पूर्ववत सुरू होऊन प्रवाशांच्या संख्येतसुद्धा वाढ होत होती. त्यामुळे गोंदिया आगाराचे उत्पन्नसुद्धा वाढले होते. मात्र आता मागील आठवड्यापासून यात पुन्हा घट होत असल्याचे चित्र आहे.

.....

वाहक २१०

चालक २००

राेजच्या बस फेऱ्या ५६०

२० हजार प्रवाशांचा रोज प्रवास

................

कोट

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आगाराकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. चालक आणि वाहकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. बसेसचेसुद्धा नियमित सॅनिटायझेशन केले जात आहे. प्रवाशांनीसुद्धा बसमधून प्रवास करताना आवश्यक ती काळजी घेऊन महामंडळाला सहकार्य करण्याची गरज आहे.

- संजना पटले, आगार व्यवस्थापक, गोंदिया

...........

कर्तव्यावर असताना नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करतो. कर्तव्यावर असताना आपण दिवसभर अनेक प्रवाशांच्या संपर्कात येतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास हाेऊ नये याचीसुद्धा पुरेपूर काळजी घेतो. शासनाने आम्हाला आरोग्यविषयक सुविधा देण्याची गरज आहे.

- एसटी चालक, गोंदिया.

......

तिकीट काढताना आणि पैसे घेताना वाहकाचा प्रवाशांशी प्रत्यक्षात संपर्क येताेच, तो टाळता येत नाही. त्यामुळे मनात थोडी भीतीसुद्धा असते. तरी मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करतो. तर अनेकदा वयोवृद्ध प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना मदतसुद्धा करावी लागते.

- एसटी वाहक, गोंदिया

Web Title: Four hundred drivers-carriers come in contact with 20,000 passengers every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.