हंडाभर पाण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात चार कि.मी.ची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:52 PM2019-06-12T14:52:00+5:302019-06-12T14:54:04+5:30
अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे. मागील पाच महिन्यापासून या गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. शेतातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आणून येथील गावकरी आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे.
गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला हे गाव. या गावाला जाण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधे रस्तेही नव्हते. रस्ते झाले असले तरी येथील पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आणि परिसरातील तलाव आणि सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने जानेवारी महिन्यापासून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सातशे लोकसंख्या असलेल्या या गावात खासगी १२ विहिरी व ५ बोअरवेल आहेत. मात्र विहिरींना जानेवारी महिन्यापासूनच पाणी नाही तर बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे. आता शेतातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी आणून कसाबसा उन्हाळा काढायचे असे धोरण गावकऱ्यांनी अवलंबविले आहे. येथील पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. मागील पाच महिन्यांपासून येथील गावकºयांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. तर तापमानात सुध्दा सातत्याने वाढ होत असल्याने हळूहळू शेतातील विहिरींनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास ही समस्या पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा विचार करुनच गावकºयांची झोप उडत असल्याचे चित्र आहे. तिल्ली ग्रामपंचायत अधिनस्थ गौरीटोला हे गाव येते.मात्र येथील लोकांना भौतिक सुविधांचाही दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाऱ्या घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन कधी जागेल असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.
सहा बोअरवेल व एक विहीर
गौरीटोला येथे शासनाने ६ बोअरवेल व एक विहीर तयार केली आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या विहिरीला थोडेफार पाणी आहे. पण बोअरवेलची बिकट स्थिती आहे. या बोअरवेलमधून पिण्यायोग्य पाणी येत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.
गावात पाणी पुरवठ्याची साधने अपुरी असल्याने दरवर्षी गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र मागील पंधरा वीस वर्षांत यंदा प्रथमच पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली. मागील पाच महिन्यापासून आम्ही शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवित आहोत.
-भिमराज चौरागडे, गावकरी, गौरीेटोला.