जिल्ह्यात लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:42+5:302021-06-28T04:20:42+5:30
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी अवघ्या देशात सुरू असलेली लसीकरणाची चळवळ जोम धरत असून, त्यानुसार जिल्ह्यातही आता लसीकरणाने वेग ...
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी अवघ्या देशात सुरू असलेली लसीकरणाची चळवळ जोम धरत असून, त्यानुसार जिल्ह्यातही आता लसीकरणाने वेग धरला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांचेच फलित आहे की, जिल्ह्याने लसीकरणात चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शनिवारपर्यंत (दि.२६) जिल्ह्यातील ४०५९१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्ह्याने राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी केल्याचीही नोंद घेण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता तज्ज्ञांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार अवघ्या देशातच लसीकरणाची मोहीम आता एक चळवळ म्हणून राबविली जात आहे. त्या चळवळीची आग आता जिल्ह्यातही पोहोचली असून जिल्ह्यात लसीकरणाने आता पूर्वीच्या तुलनेत चांगलाच जोम धरला आहे. शनिवारपर्यंतची जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी बघता ४०५९१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावरून आता नागरिक स्वत:च लसीकरणाचे फायदे बघता पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणासाठी केंद्रे वाढवून देण्यात आल्याने नागरिकांची सोय होत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात सुरुवातीपासूनच ४५-६० वर्गातील नागरिक पुढे असून, आतापर्यंत १८४०७६ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे. यात १४८७२० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ३५३५६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या गटात ११३०१० नागरिकांनी लस घेतली असून, यात ८५७५९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर २७२५१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
-----------------------
१८-४४ चा गट जोमात
केंद्र शासनाने २१ जूनपासून १८ वर्षांपुढे सर्वांनाच लस देण्यास परवानगी दिली होती. मात्र, राज्य शासनाने त्यात बदल करीत ३० वर्षांपासून परवानगी दिली असून, त्यानुसार लसीकरण सुरू आहे. विशेष म्हणजे, तरुण व युवांचा हा गट सुरुवातीपासूनच लसीकरणाची वाट बघत होता व त्यांच्यात जास्त उत्सुकता होती. ही उत्सुकता आता लसीकरणात दिसत असून, आतापर्यंत ५५६५४ युवांनी लस घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये ४८९९२ युवांनी पहिला डोस घेतला असून, ६६६२ युवांनी दुसरा डोस घेतला आहे.
----------------------------
लसीकरणाची चळवळ पोहोचली ग्रामीण भागात
कोरोना लसीला घेऊन नागरिकांत काही भ्रम निर्माण झाले होते व त्यामुळेच त्यांना लस घेण्यास भीती वाटत होती. यामुळेच लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर व लसींवरील अभ्यासातून पुढे आलेले तथ्य बघता नागरिकांच्या मनातून आता लसींबद्दलची भीती व भ्रम निघत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, देवरीसारख्या आदिवासीबहुल भागातही लसीकरणाला गती येताना दिसत आहे. शिवाय अन्य तालुक्यांतील ग्रामीण भागातही लसीकरणाची संख्या वाढत आहे.