चार महिन्यांत पेट्रोल नऊ, तर डिझेल सात रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:16+5:302021-02-11T04:31:16+5:30
गोंदिया : मागील चार महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तुंच्या ...
गोंदिया : मागील चार महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत वाढ होत असून, महागाई प्रचंड वाढ होत असल्याने, याची सर्वाधिक झळ गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मागील चार महिन्यांत पेट्रोलची किमत ९ रुपये तर डिझेल सात रुपयांनी आणि गॅस सिलिंडरची किमत १२५ रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे गृहीणींना महिन्याचे बजेट साभळताना चांगलीच दमछाक होत आहे. सर्वसामान्यांची चांगलीच होरपळ होत आहे.
वाढत्या महागाईचा अनेकांना फटका बसत आहे. दररोज काम करून खाणाऱ्या नागरिकांचे तर पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरात काही ना काही दरवाढ होत आहे. गेल्या महिनाभरापासून दरवाढीचा आलेख हा चढताच राहिला आहे. बुधवारी गोंदिया शहरातील पेट्रोल ९३.८३ रुपये, तर डिझेल ८७.११ रुपये प्रतिलीटर होते. गेल्या चार महिन्यांपासून वाढत्या महागाईचा विचार केला असता, पेट्रोल नोव्हेंबर महिन्यात ८९.०८ रुपये होते, तर डिझेल ८०.२९ रुपये तर डिसेंबर महिन्यात दरवाढ होत ९३.३१ रुपये प्रति लीटर पेट्रोल, तर डिझेल ८२.३२ रुपये प्रतिलीटर झाले होते. त्यानंतर, जानेवारी महिन्यात पेट्रोल ९५.५२ तर डिझेल ८४.९७ झाले होते. आता फेब्रुवारी महिना सुरू होताच, पेट्रोल ९७.४७ रुपये प्रतिलीटर, तर डिझेल ८७.११ रुपये प्रतिलीटर झाले आहे. म्हणजेच दिवसागणिक वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा परिणाम हा मार्केटवरही दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूही महागल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आता विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करायला सुरुवात केली असली, तरी वाढलेले दर मात्र आता खाली येण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. वाढत्या डिझेलच्या दरामुळे शेती खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक सुशिक्षित बेरोजगार व महिला वर्गांना गॅस सिलिंडरचा वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिन्याचा घरखर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरकारने किमान पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर्सच्या किमती आटोक्यात अशी मागणी आहे.
.....
दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता कुठे संसाराची घडी बसली होती. मात्र, वाढत्या पेट्रोल-डिझेलने गोरगरिबांचे हाल होत आहेत.
- सविता बेदरकर,सामाजिक कार्यकर्ता
....
गोंदिया जिल्ह्यात एकीकडे तरुणांना अपेक्षित रोजगार नाही, तर दुसरीकडे वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे.
कोरोनाच्या काळात संपूर्ण देश ठप्प होते. वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. मात्र, त्यानंतर आता वाढत्या महागाईच्या संकटाने जगणे मुश्कील झाले आहे.
-आशिष पाऊलझगडे, सुशिक्षित तरुण, गोंदिया
....
पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास १२५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गरिबांनी कसे जगावे, असा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, महागाईचे दररोज चटके बसत आहेत.
-अनिल रहिले,सामाजिक कार्यकर्ते, आसोली