जिल्ह्यात ४ नवीन कोरोना बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 03:44 PM2021-12-30T15:44:29+5:302021-12-30T15:51:48+5:30
जिल्ह्यात सोमवारी २, मंगळवारी १, बुधवारी ५ तर गुरुवारी आणखी ४ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील १२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली असून ११ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तर, गोंदिया तालुक्यातील १ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.
गोंदिया : जिल्ह्यात सोमवारपासून सलग कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसून येत असतानाच गुरुवारीही (दि.३०) आणखी नवीन ४ बाधितांची भर पडली. यामुळे सलग ४ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १२ ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. एकंदर जिल्ह्यात कोरोना पाय पसरताना दिसत असून आता धोका वाढला आहे.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता व सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. यामध्ये मधामधात १-२ बाधितांची भर पडत होती व तशीच सुटी होत असल्याने तेवढाच दिलासा होता. त्यात तब्बल ६ महिन्यांनंतर १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका रुग्णाचा जीव गेला व तेव्हापासूनच कोरोना पाय पसरण्याचे संकेत मिळू लागले होते. असे असतानाच सोमवारी २, मंगळवारी १, बुधवारी ५ तर गुरुवारी (दि.३०) आणखी ४ बाधितांची भर पडली आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यात १२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे. यातील ११ रुग्ण घरीच अलगीकरणात असून गोंदिया तालुक्यातील १ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१२५१ रुग्ण कोरोना बाधित झाले असून, यातील ४०५३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, तब्बल ५७७ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. त्यात आता दररोज होत असलेली रुग्ण वाढ जिल्ह्यात कोरोना पुन्हा पाय पसरत असल्याचे दाखवून देत आहे.
आतापर्यंत ४७१५८१ चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत ४७१५८१ चाचण्या घेण्यात आल्या असून यामध्ये २४७१५३ आरटी-पीसीआर तर २२४४२८ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. तर बुधवारी २१५ चाचण्या घेण्यात आल्या असून यामध्ये १८९ आरटी-पीसीआर तर २६ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत.
आता तरी कोरोना लस घ्या
कोरोनाला मात देण्यासाठी लस घेणे गरजेचे असून लसीमुळेच कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याचे दिसत आहे. असे असतानाही कित्येकांनी लस घेतलेली नाही. तर दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आता कोरोना पुन्हा पाय पसरत असून लस न घेणाऱ्यांना स्वत: तसेच त्यांच्या कुटुंबीय व संपर्कातील व्यक्तींना धोका आहे. आता तरी अशांनी लस घेणे गरजेचे असून यानंतरच कोरोना नियंत्रणात येणार.