चार कुख्यात आरोपींवर लावला मकोका, पोलिसांनी केली कारवाई

By कपिल केकत | Published: January 7, 2024 05:32 PM2024-01-07T17:32:39+5:302024-01-07T17:34:31+5:30

गोंदिया : खंडणीसह अन्य कित्येक प्रकारचे गुन्हे पोलिसांत दाखल असलेल्या चौघा आरोपींवर पोलिसांनी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ...

Four notorious accused were arrested, police took action | चार कुख्यात आरोपींवर लावला मकोका, पोलिसांनी केली कारवाई

चार कुख्यात आरोपींवर लावला मकोका, पोलिसांनी केली कारवाई

गोंदिया : खंडणीसह अन्य कित्येक प्रकारचे गुन्हे पोलिसांत दाखल असलेल्या चौघा आरोपींवर पोलिसांनी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सन- 1999) अंतर्गत कारवाई केली आहे. या चौघांवर खंडणीसह अन्य कित्येक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील तिघांना अटक करण्यात आली असून चौथा फरार आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांनी शुक्रवारी (दि.५) याबाबत आदेश दिले होते.

रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत एका प्रकरणात आरोपी शाहरुख फरीद खान पठाण (२९, रा. गड्डाटोली), दुर्गेश ऊर्फ डॅनी रमेश खरे (३१, रा. बसंतनगर), आदर्श ऊर्फ बाबूलाल भगत (२०, रा. बापट चाळ) व संकेत अजय बोरकर (२०, रा. कन्हारटोली) यांनी फिर्यादीस खंडणी मागितल्यास रामनगर पोलिसांत भादंवि कलम ३८६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना आरोपीतांनी संघटितरीत्या टोळी निर्माण करून जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केले. त्यांचा अंतिम हेतू स्वतःकरिता आर्थिक फायदा मिळविणे हाच असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीतांच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेऊन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस निरीक्षक रामनगर यांना या संघटित टोळीविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार, रामनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी चारही आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी पोलिस उपमहानिरीक्षकांकडे २० डिसेंबर २०१३ रोजी मंजुरीस्तव सादर केला होता. त्याला पोलिस उपमहानिरीक्षकांनी शुक्रवारी (दि. ५) मंजुरी देत आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कलमवाढ करून पुढील तपास करण्याचे आदेश पारीत केले आहे. ही मकोका कारवाई स्थागुशा निरीक्षक दिनेश लबडे, पोनि. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि राजू बस्तावडे, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार चेतन पटले, प्रकाश गायधने, स्थागुशा आणि सहायक फौजदार राजू भगत, हवालदार जनबंधू यांनी पार पाडली आहे.

गुन्हेगारांची आता खैर नाही

पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पूर्व इतिहास लक्षात घेऊन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी वाढत्या संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यातील संघटितरीत्या गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक धोरण राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. यातूनच सन २०२३ मधील मकोकाची ही तिसऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे पोलिस अधीक्षक पिंगळे यांचे कडक निर्देश असल्यामुळे गुन्हेगारांची आता खैर नाही हे मात्र स्पष्ट दिसून येत आहे.

आरोपींवर आहेत कित्येक गुन्हे दाखल

टोळी प्रमुख शाहरुख खाने याने १० वर्षांच्या काळात विविध साथीदारांना सोबत गुन्हे केले आहेत. अशाप्रकारे शाहरुख खान याने सहा गुन्हे, दुर्गेश ऊर्फ डेनी खरे याने १३ गुन्हे, आदर्श भगत याने सहा गुन्हे, तर संकेत बोरकर याने पाच गुन्हे केले आहेत. टोळीने मागील १० वर्षांपासून संघटितरीत्या गुन्ह्यांची मालिका केलेली आहे. या टोळीविरुद्ध इतरांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती करणेे, इच्छापूर्वक दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, हमला करणे किंवा खंडणी वसुल करणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, जबरी चोरी, धमकी देणे, शिवीगाळ करणे यासारख्या विविध शीर्षकाखाली गंभीर गुन्हे केले आहेत. गैरकृत्याद्वारे मिळणाऱ्या पैशांवर गुन्हेगार ऐश आरामाचे आणि चैनीचे जीवन जगत आहेत.

Web Title: Four notorious accused were arrested, police took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.