भरधाव मेटाडोरच्या धडकेत चौघे जखमी
By admin | Published: July 12, 2017 02:22 AM2017-07-12T02:22:08+5:302017-07-12T02:22:08+5:30
भरधाव वेगात असलेल्या मेटाडोरने वेगवेगळ्या स्थानांवर दुचाकींना दिलेल्या धडकेत चौघे जखमी झाले.
गोरठा व किडंगीपार येथील घटना : चालक वाहन सोडून पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : भरधाव वेगात असलेल्या मेटाडोरने वेगवेगळ्या स्थानांवर दुचाकींना दिलेल्या धडकेत चौघे जखमी झाले. आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम गोरठा व किडंगीपार येथे मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजता दरम्यान ही घटना घडली.
माहितीनुसार, गोंदियाहून आमगावकडे भरधाव वेगात मेटाडोर क्रमांक एमएच १६/ एवाय ९२७ येत होता. तर गोरठाहून बोथलीकडे जात असताना कमल खोटेले (रा.गोंदिया) व पत्नी कविता यांच्या नवीन दुचाकीला मेटाडोरने धडक मारली. यात कमल यांचा पाय फॅ्रक्चर झाला व कविता गंभीर जखमी झाल्या. या अपघाताने घाबरलेल्या मेटाडोर चालकाने आणखी भरधाव वेगात वाहन चालविले व पुढे ग्राम किडंगीपार येथे साई समर्थ रेस्टॉरेंट समोर दुचाकी क्रमांक एमएच ३५/टी ११६५ ला धडक मारली.
येथे दुचाकीस्वार रूपेश भरतलाल बिसने (२२) यांचाही पाय फ्रॅक्चर झाला. तर इंदू किशनलाल बिसने (२१,रा.कातुर्ली) जखमी झाली. दोघे भाऊ-बहीण कातुर्ली या आपल्या गावी जात होते.
या अपघातानंतर मात्र चालक मेटाडोर सोडून पसार झाला. सदर मेटाडोर अंकीत जैन नामक व्यक्तीचा असून चालकाचे नाव नेतराम गेडाम असून तो किकरीपार निवासी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही सामाजीक कार्यकर्त्यांनी १०८ क्रमांकावरून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र सुमारे ४५ मिनीटे रूग्णवाहिका घटनास्थळा पोहोचली नव्हती.
यामुळे जखमींना खाजगी वाहनातून गोंदियाच्या जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. पोलीस तपास करीत आहे.