चार प्रकल्पांचे पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:05 AM2018-04-13T01:05:48+5:302018-04-13T01:06:54+5:30
गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले. त्यावरुन जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या किती गंभीर आहे दिसून येते.
शहरात मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने पुजारीेटोला धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. मात्र पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाल्याने मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध आणि इटियाडोह या चार प्रकल्पाचे पाणी सोडले आहे. यापैकी पुजारीटोला धरणातून २५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर कालीसरार जलाशयाचे १ गेट उघडण्यात आला असून त्यातून ३८२ क्यूसेक पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे.
शिरपूर जलाशयाचे दोन गेट उघडले असून त्यातून ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. शिरपूर व कालीसरार जलाशयाचे पाणी पुजारीटोला जलाशयात सोडून ते कालव्याच्या माध्यमातून सोडले जात आहे. याचा कालव्यालगत असलेल्या गावांना सुध्दा लाभ होणार आहे. इटियाडोह जलाशयाचे पाणी गाढवी नदीत सोडून ते पाणी कालव्याच्या माध्यमातून गावापर्यंत पोहचविले जाणार आहे.
हे पाणी सोडल्यामुळे कालव्याच्या किनाऱ्या लगत असलेल्या गावांची भूजल पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निर्देशानुसार इडियाडोह जलाशयाचे पाणी सोडण्यात आल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.