अखेरच्या घटका मोजणाऱ्या शाळेला चौघींनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:09+5:30
या ऐतिहासिक शाळेची पटसंख्या सन २०१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी १५ होती. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेकडे शहरातीलच पालकांनी पाठ फिरविली. त्याला विविध कारणे असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळातील या शाळेचे दुर्देव की तिला विद्यार्थ्यांची वाट होती. विद्यार्थी या शाळेकडे फिरकायला तयार नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यात सर्वात प्रथम सन १८८७ मध्ये स्थापन झालेली ऐतिहासिक शाळा म्हणजे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. प्रचंड विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत कधी विद्यार्थी मिळणारच नाही अशी वेळ येऊ शकते, असे कुणाला कधी स्वप्नातही वाटले नसेल. पण असे झाले. या ऐतिहासिक शाळेची पटसंख्या सन २०१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी १५ होती. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेकडे शहरातीलच पालकांनी पाठ फिरविली. त्याला विविध कारणे असली तरी स्वातंत्र्य पूर्व काळातील या शाळेचे दुर्देव की तिला विद्यार्थ्यांची वाट होती. विद्यार्थी या शाळेकडे फिरकायला तयार नव्हते. अशात सन २०१८ मधील बदल्यांत चार शिक्षिका या शाळेत बदलून आल्या व त्यांच्या प्रयत्नांनी या शाळेला जीवदान मिळाले.
बांते, पटले, चिंचमलातपुरे आणि भोंगाडे या चार शिक्षिकांच्या आगमनाने शाळेत आशेचा किरण दिसला. या चौघींनी जेव्हा शाळेत पहिले पाऊल टाकले तेव्हा शाळेची दुरवस्था बघून तर त्या हवालदिल झाल्या. विद्यार्थी तर नाहीतच पण शाळेमध्ये भौतिक सोयींचा अतिशय अभाव होता.
शाळा अतिशय जूनी व निरूत्साही अशा कंटाळवाण्या खोल्या, शाळेच्या रंगरूपाचा पूर्णपणे अभाव त्या शिक्षिकांना दिसला. परंतु शाळेचा चेहरामोहरा बदलविण्याचा चंग मुख्याध्यापिका बांते व त्यांच्या इतर सहकारी शिक्षिकांनी बांधला.
त्यानुसार, शाळेचा चेहरामोहरा बदलविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली व शिक्षिका कामाला लागल्या. आधी पटसंख्या वाढविण्याला सुरूवात केली. शाळेची शोभा म्हणजे विद्यार्थी. परंतु तेच नसतील तर ती वस्तू शाळा होऊच शकणार नाही.
त्यासाठी शाळा सुरू होण्याच्या ८ दिवसांपूर्वी त्यांनी गावातच मुक्काम केला. पालकांच्या भेटी घेणे त्यांचे मन वाळविणे हे खुले जटील काम होते. पण सततच्या पाठपुराव्याने यश आले. काही पालक या चौघींच्या विश्वासावर मुलांना या शाळेत प्रवेश देण्यास तयार झाले.
आता हळुहळु मुले तर शाळेत प्रवेश घेऊ लागली पण कंटाळवाने असलेले शाळेचे रूप बदलून गेले आहे.
निराश व कंटाळवाण्या वातावरणात विद्यार्थ्यांना पूर्णवेळ बसण्यास प्रेरित करणे अवघड होते. अशात या चौघींनी प्रथम स्वत: पासून सुरूवात केली. शाळेला नवरूप आणण्यासाठी मग शाळा व्यवस्थापन समितीला सुद्धा हुरूप आला व ते सुद्धा मदतीला तयार झाले. स्वत: व लोकसहभागातून शाळेचे रूप बऱ्याच प्रमाणात बदलण्यात त्या यशस्वी झाल्या.
तिरोडा तालुक्यात सर्वात जूनी असलेली शाळा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर होती. परंतु या शाळेतील चौघा शिक्षिकांनी या शाळेला फुलविण्याचे काम केले. पटसंख्या व गुणवत्ता वाढीवर त्यांचा भर आहे.
-डॉ. किरण धांडे
वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.
आव्हान गुणवत्ता वाढविण्याचे
प्रवेशित मुलांची गुणवत्ता वाढविणे हे फार मोठे आव्हान त्या चौघा शिक्षिकांसमोर होते. कारण शहरी भागात जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोण थोडासा नकारात्मक असतो. त्यामुळे शिक्षणाबाबत जागरूक असलेले पालक या शाळेकडे वळतच नव्हते. शहरातील खाजगी शाळांकडे त्यांचे लक्ष होते. या शाळेत प्रवेशीत सर्व मुले ज्यांच्या पालकांना फारसा शिक्षणाचा गंध नाही अशी आहेत. परंतु या चारही शिक्षिकांची आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. खासगी शाळांच्या बरोबरीचा विद्यार्थी या शाळेतून घडावा अशी गुणवत्ता विद्यार्थ्यांत टाकण्याचे आव्हान त्या शिक्षिकांपुढे आहे.
पालकांचा विश्वास बसला
मुलांच्या गुणवत्तेसाठी त्या चारही शिक्षिकांनी कंबर कसली. आज या शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तम वाचन करतात. त्याचप्रमाणे ईयत्ता पहिली सोडून सर्व मुले भागाकार स्तरावर आहेत. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या शाळेचा आजची पटसंख्या ३५ झाली. पुढच्या सत्रात ही पटसंख्या अजून वाढणार आहे. कारण आपले मूल या सरकारी शाळेतही उत्तम शिकू शकतात हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे.