चोरट्यांच्या शोधासाठी चार पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 11:30 PM2018-11-08T23:30:03+5:302018-11-08T23:31:31+5:30
तुमसर येथील सराफा व्यवसायीकाच्या कारचे काच कापून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला आठवडा लोटला तरी आरोपींचा शोध लागला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तुमसर येथील सराफा व्यवसायीकाच्या कारचे काच कापून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला आठवडा लोटला तरी आरोपींचा शोध लागला नाही. या प्रकरणातील चोरट्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी चार पथक तयार केले आहेत.
तुमसर शहरातील (भंडारा) सराफा लाईन येथील दर्शित विजय राणपुरा (२७) हे ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता कुडवा नाका परिसरातील एपी रेस्टॉरेंट समोर कार क्रमांक एमएच ३६-जेड २५१२ उभी करून ते जेवण करायला गेले होते. जेवण करून ते आपल्या कारजवळ आले असता त्यांच्या कारचे काच फुटलेले आढळले. निरखून बघितले तेव्हा कटरने काच कापल्याचे दिसून आले. यावर त्यांनी दार उघडून पाहिले असता आत ठेवलेले ६४ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने व ३ लाख रूपये रोख चोरीला गेल्याचे लक्षात आले.
यासंदर्भात रामनगर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवीच्या कलम ३७९ अंतर्गत प्रकरण नोंद केले. कारचे काच कापण्यासाठी उपयोगात आणलेले लोखंडी औजार, स्कू्र ड्रायवर व रूमाल कारमधून जप्त करण्यात आले. कारमधून चोरीला गेलेल्या दागिन्यांत सोन्याचे मनी, पिटीव मनी, अंगठ्या, टॉप्स, पेंडंट, एकदानी, दोन पॅकेट मनी, पुणेशाही नथ, व्यापाऱ्यांना विकण्यात आलेल्या दागिण्यांचा हिशोब व दोन पासबूक साईज डायरी होत्या.
प्रकरणाचा तपास करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यातील दोन पथक, स्थानिक गुन्हे शाखेचा एक पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांचा एक पथक असे चार पथक तयार करण्यात आले आहेत. हे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.