चार हजार पर्यटक वाढले
By Admin | Published: January 12, 2016 01:31 AM2016-01-12T01:31:44+5:302016-01-12T01:31:44+5:30
जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आकर्षण वनपर्यटकांमध्ये हळूहळू वाढायला लागले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्र : गतवर्षीच्या तुलनेत ७.९२ लाखांचे अधिक उत्पन्न
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आकर्षण वनपर्यटकांमध्ये हळूहळू वाढायला लागले आहे. या प्रकल्पाला भेटी देणाऱ्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास चार हजार पर्यटकांची भर पडली आहे. वन्यजीव विभागाने नोंदविलेल्या संख्येमुळे ही बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत सात लाख ९२ हजार ३७६ रूपयांचे अधिक उत्पन्न पर्यटकांच्या माध्यमातून वन्यजीव विभागाला झाले आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान २४ हजार ९९३ पर्यटकांनी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. यावर्षी सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबरदरम्यान व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून २८ हजार ८२० झाली. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी काही विशेष सुविधा वन व वन्यजीव विभागाकडून वाढविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येत आहे. खुल्या जिप्सीतून वाघाचे दर्शन करणे या हेतून पर्यटक येतात, पण बहुतांश पर्यटकांना वाघ किंवा बिबट्याचे दर्शन मात्र होत नाही. इतर प्राण्यांचे मात्र हमखास दर्शन होते.
कॅमेरा शुल्कातून १.६९ लाख
वन्यजीवांच्या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून पर्यटक गोंदिया जिल्ह्यात येतात. या पर्यटकांना वन्य प्राण्यांचे छायाचित्र काढण्याचे आकर्षण असते. त्यासाठी अनेक जण स्वत:चे कॅमेरे आणतात. एवढेच नाही तर भाड्यानेही कॅमेरे उपलब्ध करून दिले जातात. सन २०१४ मध्ये नऊ महिन्यांत एक हजार ५८१ पर्यटकांनी वन विभागाच्या कॅमेऱ्यांचा उपयोग केला. त्याद्वारे एक लाख ४० हजार २१४ रूपये वन्यजीव विभागाच्या खात्यात जमा झाले. सन २०१५ मध्ये एक हजार ७७९ पर्यटकांनी कॅमेऱ्यांचा उपयोग केला. त्याद्वारे वन्यजीव विभागाला एक लाख ६९ हजार ०७५ रूपयांचे शुल्क प्राप्त झाले.
प्रचार-प्रसारासाठी व्यवस्थेचा अभाव
नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प १२ डिसेंबर २०१३ ला अस्तित्वात आला. राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प म्हणून याची घोषणा झाल्यानंतर याच्या प्रचार व प्रसारासाठी कोणतेही ठोस पाऊल वन्यजीव विभागाने उचलले नाही. त्यामुळे आजही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची ओळख लोकांना नाही. केवळ ‘माऊथ पब्लिसिटी’मधून जो झाला त्याच प्रचारावर पर्यटक येथे आशेने येतात. वन्यजीव विभागाला प्रचार-प्रसारासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक जेवढ्या संख्येत येणे अपेक्षित असते, तेवढ्या संख्येत येत नाही. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा वन्यजीव विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
वाहनांची संख्या वाढली
बाहेरून आलेल्या पर्यटकांना वन्यजीव विभागाच्या वतीने जंगल सफारीसाठी वाहनांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. एप्रिल ते डिसेंबर २०१४ या ९ महिन्यात वाहनांच्या चार हजार १५५ फेऱ्यांमधून ४ लाख २४ हजार ५४५ रूपयांचे शुल्क उपलब्ध झाले आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबरदरम्यान जंगलात वाहनांच्या ५ हजार ४०५ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे सात लाख ६५ हजार २१५ रूपयांचे शुल्क वन्यजीव विभागाने पर्यटकांकडून वसूल केले.