चार झाले मुक्त पण दोन बाधितांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:17+5:30
मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले दोन कोरोना बाधीत रुग्णांना सुध्दा बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. विशेष आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. शहर भागातील कोरोना बाधितांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब जरी चिंता वाढविणारी असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सोमवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. तर चार कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी (दि.२) गोंदिया तालुक्यात एक आणि सालेकसा तालुक्यात १ असे दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. मात्र मंगळवारी पुन्हा चार जण कोरोनामुक्त झाल्याने आत्तापर्यंत एकूण ४८ जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता २१ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे मंगळवारचा दिवस जिल्हावासीयांसाठी चार झाले मुक्त पण दोन बाधितांची भर असाच ठरला.
जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेले सर्व ६९ कोरोना बाधीत रुग्ण हे बाहेरील जिल्हा आणि राज्यातून आलेले आहे. काहीजण बाहेर जिल्हा आणि राज्यातून आल्यानंतर त्याची माहिती प्रशासनाला न देता थेट आपल्या घरी जात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. परिणामी दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले दोन कोरोना बाधीत रुग्णांना सुध्दा बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. विशेष आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. शहर भागातील कोरोना बाधितांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब जरी चिंता वाढविणारी असली तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४८ कोरोना बाधीत कोरोना मुक्त झाल्याने ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा जरी ६९ वर पोहचला असला तरी सध्या स्थितीत केवळ २१ अॅक्टीव्ह कोराना बाधीतांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.
सहा दिवसात ४८ जण कोरोनामुक्त झाल्याने सुटी
जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित १० एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. त्यानंतर २८ मे रोजी २, २९ मे रोजी २५, ३० मे ४, ३१ मे ६, १ जून रोजी ६, २ जून रोजी ४ असे एकूण ४८ कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली.
असा आहे कोरोनाबाधितांचा वाढता आलेख
जिल्ह्यात २६ मार्च ते २ जून दरम्यान एकूण ६९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे. १९ मे रोजी जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्यानंतर सातत्याने कोरोना बाधीतांचा आकडा वाढत गेला. २६ मार्च रोजी १, १९ मे २, २१ मे २७, २२ मे १०, २४ मे ४, २५ मे ४, २६ मे १, २७ मे १, २८ मे ९, २९ मे ३, २० मे ४, ३१ मे १, आणि २ जून रोजी २ असे आत्तापर्यंत ६९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले.
आतापर्यंत ९२८ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण १०३० जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी ९२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ६९ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ३३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये ३११९ व्यक्ती आणि गृह अलगीकरणात २२४८ व्यक्ती आहेत. असे एकूण ५३६७ जण क्वारंटाईन आहेत.