मेडिकलच्या सेवेतील चार महिला पोलिसांची कुचंबना
By admin | Published: August 2, 2016 12:20 AM2016-08-02T00:20:36+5:302016-08-02T00:20:36+5:30
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे नियुक्त
रायफल्ससुद्धा असुरक्षित : छोट्या पोलीस चौकीत घालवावी लागते रात्र
गोंदिया : गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाकडे सुरक्षेची मागणी करण्यात आली. पोलीस विभागाने रात्रीसाठी तिथे चार महिला पोलीस कर्मचारी व एक पुरूष हवालदार यांना नियुक्त केले. परंतु रात्रीच्या वेळी हे पोलीस शिपाईच असुरक्षितच्या वातावरणात असतात. यामुळे सध्या सदर महिला पोलीस शिपाई चांगल्याच त्रस्त असल्याचे समजते.
मागील चार दिवसांपासून सदर चार महिला पोलीस कर्मचारी व एक पोलीस हवालदार केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आकस्मिक वार्डाजवळ बनलेल्या पोलीस चौकीत रात्र घालवित आहेत. तेथे आधीपासूनच एक पोलीस कर्मचारी नियुक्त आहे. पोलीस चौकीसाठी देण्यात आलेली खोलीसुद्धा खूपच लहान आहे. आधीपासून कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यासाठी तेथे एका खाटेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे चार महिला व एका पोलीस कर्मचाऱ्याला खाली जमिनीवर आपल्या घरून आणलेली चादर टाकून आराम करावा लागतो.
विशेष म्हणजे रूग्णालयाकडून त्यांच्यासाठी खाटांची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली नाही. बेड व चादरीसुद्धा पुरविण्यात आल्या नाहीत. अत्यंत लहान अशा खोलीत त्यांना मोठा त्रास सहन करीत कशीबशी रात्र काढावी लागत आहे.
आधीपासून नियुक्त असलेला पोलीस कर्मचारी रूग्णालयात कोणत्याही घटनेनंतर येणाऱ्या जखमी किंवा रूग्णांचे बयान नोंदविण्यासाठी आहे. मात्र नवीन नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. परंतु रात्रीच्या वेळी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत स्वत:च्या जीविताचे संरक्षण करण्यासोबत जवळ असणाऱ्या रायफलीही सांभाळाव्या लागत आहेत.
सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना एक दुसरी खोली देण्यात आली होती, असे सांगितले जाते. मात्र त्या खोलीत जवळील खोलीतील रूग्णांचा त्रास होत होता.
त्यामुळे ती खोली त्यांनी सोडून दिली. आता त्यांच्यासाठी कोणतीही दुसरी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यांनी या संदर्भात आपले अधिकारी व रूग्णालयातील वरिष्ठांनासुद्धा माहिती दिली आहे. (प्रतिनिधी)
मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे परिचय सत्र
गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० जागांपैकी ८३ जागांवरील प्रवेश पूर्ण झाले आहेत. सोमवार १ आॅगस्ट रोजी त्या विद्यार्थ्यांचे परिचय सत्र झाले. एकमेकांशी परिचय करून घेण्यासोबतच इमारत आणि विविध विभागांची माहिती त्यांना देण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ.केवलिया यांनी सांगितले. लवकरच त्यांचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत.
जर त्या कर्मचाऱ्यांना काही त्रास असेल तर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना याची माहिती द्यायला हवी. आमच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी बोलविण्यात आलेल्या सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक खोली त्यांना दिलेली आहे. जर ती खोली त्यांच्यायोग्य नसेल तर आम्ही काय करू शकतो? सद्यस्थितीत त्यांची व्यवस्था आधीपासूनच असलेल्या पोलीस चौकीत केली आहे. त्यांना दिलेली खोली सर्वप्रकारे योग्य आहे. जवळच डॉक्टर रूम आहे, नर्स रूम व ड्रायव्हर रूमसुद्धा आहे.
- डॉ. अजय केवलिया,
प्रभारी डीन, मेडिकल कॉलेज, गोंदिया