चार वर्षांपासून तलाठी साज्यांचे भाडे प्रलंबित
By admin | Published: October 13, 2016 01:49 AM2016-10-13T01:49:49+5:302016-10-13T01:49:49+5:30
गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात.
तिरोडा तालुका : तलाठ्यांच्या खिशांवर पडतोय भुर्दंड
गोंदिया : गावस्तरावर महसूल विभागाची सर्वच कामे तलाठी साज्यांमधून होतात. गावागावात तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ग्रामस्थांच्या घरी भाड्याने हे साजे चालतात. मात्र शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे तिरोडा तालुक्यातील तलाठी साज्यांचे भाडे मागील चार वर्षांपासून देण्यात आले नाही. याचा आर्थिक ओझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे.
तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत एकूण ३३ तलाठी साजे आहेत. जवळपास सर्वच साजे भाड्यावर आहेत. या ३३ साज्यांमध्ये ३० तलाठी कार्यरत असून तीन तलाठी निलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. एका साज्यांतर्गत तीन ते चार गावांचा समावेश असतो. शिवाय पदभरती न झाल्याने किंवा निलंबनाच्या कारवाईमुळे एखाद्या साज्यात तलाठी नसला तर जवळच्या साज्यातील तलाठ्यावर त्या साज्याचा भार सोपविला जातो. त्यामुळे क्षेत्र वाढल्याने तलाठ्यावर कामाचा भारही वाढतो.
अशावेळी शासनाकडून तलाठी साज्याचे भाडेच उपलब्ध झाले नाही तर तलाठ्यांना स्वत:च्या खिशातून भाडे देण्याचा प्रसंग येतो. असाच प्रकार तिरोडा तालुक्यात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या साज्यांचे भाडे सन २०१२ पासून आतापर्यंत देण्यात आले नाही. या कालावधीत केवळ जुलै २०१३ व आॅगस्ट २०१३ या दोनच महिन्यांचे भाडे देण्यात आले आहेत. उर्वरित चार वर्षांतील इतर महिन्यांचे भाडे अद्यापही शासनाकडून उपलब्ध न झाल्याने संबंधित तलाठ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.
महसूल विभाग महसूल गोळा करून शासनाला पुरवठा करतो. मात्र महसुलाचे काम चालणाऱ्या गावस्तरावरील कार्यालयांचे भाडे देण्याकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही साज्याचे भाडे काढण्यात आले नाही. त्यामुळे तलाठ्यांना संबंधित खोलीच्या मालकाचे बोलणे ऐकावे लागत असल्याचे काही तलाठ्यांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)