युवकाच्या मृतदेहासह गावात पोहचले १४ युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ते युवक पायी प्रवास करीत गावाकडे निघाले. काही अंतरावर एक टँकर मिळाल्याने त्या माध्यमातून प्रवास करीत होते. त्यातच टँकरचा अपघात झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर १४ युवक जखमी झाले. सर्व जखमींना आंध्रप्रदेशातील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी (दि.१९) रोजी त्यांना रूग्णालयातून सुटी देऊन रूग्णवाहिकेच्या माध्यमातून गोरेगाव तालुक्यातील परसोडीटोला गावात सोडण्यात आले. दरम्यान एका युवकाच्या मृतदेहासह १४ युवक गावात पोहोचताच परिसरात शोककळा पसरली.
गोरेगाव तालुक्यातील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेश राज्यात गेले होते. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे ते युवक तिथेच अडकून पडले.१५ एप्रिलनंतर मुभा मिळेल, या आशेवर कंत्राटदाराच्या आश्रयाखाली ते तिथेच थांबले होते. मात्र, १५ एप्रिलनंतर संचारबंदीत वाढ झाल्याने ते १५ युवक गावी येण्यासाठी पायीच निघाले. काही अंतरावर आल्यानंतर एक टँकर चालकाने त्यांना मदत केली. सर्व युवक टँकरमध्ये बसून येत असताना टँकरचा अपघात झाला. या घटनेत राजेश प्रेमलाल ऊईके रा.परसोडीटोला या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर चौदा जण जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी हैदराबाद येथे पुन्हा दाखल करण्यात आले. रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर १४ युवकांना राजेशच्या मृतदेहासह रूग्णवाहिकेने गोरेगाव येथील परसोडीटोला येथे पाठविण्यात आले. ते १४ युवक मृतदेहासह गावात पोहोचताच शोककळा पसरली. लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्यांचे प्रचंड हाल होत असल्याने ते मिळेल त्या साधनाने अथवा पायीच आपल्या गावाकडे परतत आहेत.