भजियापार शाळेत दरवळणार आता चंदनाचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:50+5:302021-09-27T04:30:50+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील भजियापार येथील जिल्हा परिषद शाळेत गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी चंदनाची ६० झाडे ...
गोंदिया : जिल्ह्यातील भजियापार येथील जिल्हा परिषद शाळेत गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी चंदनाची ६० झाडे ट्री-गार्डसहीत लावली. या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्पदेखील केला. त्यामुळे या शाळेत आता चंदनाचा सुगंध दरवळणार आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे पूर, अवर्षण, दुष्काळ, भूकंप, वादळ यांसारखी अनेक संकटे निर्माण होत आहेत. झाडे हे मानवाचे मित्र आहेत. झाडांशिवाय प्राणी जीवन जगू शकत नाही. परंतु आज माणूसच झाडांचा शत्रू झाला आहे. 'झाडे लावा - जीवन वाचवा' म्हणणारेच झाडं लावतांना दिसत नाहीत. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे सौंदर्य फुलण्यासाठी सर्वांनी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज झाली आहे. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वाय. बी. बिसेन, व्ही. एस. कुंभलवार, एस. आर. असाटी, एस. टी. राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमलाल गौतम, जैपाल ठाकूर, तुकडूदास रहांगडाले, गौरीशंकर रहांगडाले, नानीकराम टेंभरे, तिलकचंद कटरे, कविता सिंधीमेश्राम, बाबा चव्हाण, भाऊलाल रहांगडाले, छोटू रहांगडाले, अनिल तुरकर, दिनेश रहांगडाले, ईठा सोनवाने, पंधरे यांनी सहकार्य केले.