मजुरांच्या मजुरीचे ७.५० लाख न देता केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:59 PM2021-12-08T16:59:54+5:302021-12-08T17:08:30+5:30
आधी कामानिमित्त पैसे मागितले व परत करण्याचावेळी आरोपींनी त्यांना पैसे न देता शिवीगाळ करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथे रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू असताना त्या कामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या मजुरांचे ७ लाख ५० हजार रुपये भाडे करून वापरण्यास मागितले. ते पैसे विश्वासाने दिले. परंतु नंतर परत मागितल्यावर पैसे न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.
काचेवानीच्या बसस्थानकावर राहणारे लालटू लुटपार रहमान (३३) यांच्या घरी आरोपी हे भाड्याने राहतात. काचेवानी येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामाचे कंत्राट आरोपी व लालटू करीत आहेत. या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे ७ लाख ५० हजार रूपये आर ई.डब्ल्यू कंपनी मथुरा यांनी दिले.
ते पैसे दोन-तीन दिवस वापरण्याकरिता भाडेकरूने मागितले. विश्वासाने त्यांनी ७ लाख ५० हजार रुपये दिले. परंतु तीन दिवसांनंतर पैसे मागितल्यावर दोन्ही आरोपींनी त्यांना पैसे न देता शिवीगाळ करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नायक रक्से करीत आहेत.