मोफत सायकल वाटपास विलंब

By admin | Published: August 17, 2014 11:16 PM2014-08-17T23:16:24+5:302014-08-17T23:16:24+5:30

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे.

Free cycle passing delay | मोफत सायकल वाटपास विलंब

मोफत सायकल वाटपास विलंब

Next

बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सर्वच मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा या दरम्यान बस वाहतुकीची सुविधा मानव विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. जिथे बससेवा पोहचु शकत नाही, तेथील विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरवठा चालु शैक्षणिक सत्रापासून सुरु केला आहे. मात्र अनुदान मिळून सुद्धा तालुक्यातील काही शाळांनी विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करुन दिल्या नाही. अनुदान लाटण्याचा हा प्रकार तर होणार नाही ना अशी शंका परिसरात वर्तविली जात आहे.
राज्य शासनाने १९ जुलै २०११ नुसार सुधारित आणि विस्तारीत मानव विकास कार्यक्रम राज्यातील २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना लागू केला आहे. यामध्ये अर्जुनी/मोर तालुक्याचा सुद्धा समावेश आहे. मानव विकास कार्यक्रमात १३ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यात शिक्षण विभागाचा समावेश आहे. तालुका स्तरावर मानव विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांस महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. ते तालुका मानव विकास समितीचे अध्यक्ष असतात. सदर कार्यक्रमाची तालुक्यात अंमलबजावणी होते काय याकडे संबंधितांनी तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ती तत्परता आजतरी दिसून येत नाही. ग्रामीण भागातील कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण सहज उपलब्ध करुन देण्यात आले. तालुकास्तरावर काही नामांकित शाळा सोडल्या तर उर्वरित शाळेतील मुलींना मानव विकास कार्यक्रमाच्या बससेवेचा लाभ होताना दिसत आहे. शाळांपासून काही अंतरावर मुली ये-जा करतात. जिथे बससेवा पोहचत नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थिनींना मोफत सायकल पुरविण्याचा उपक्रम मानव विकास कार्यक्रमाच्यावतीने सुरु आहे. तालुक्यातील ३० शाळांमधील ६६६ विद्यार्थिनींची सायकल वाटपासाठी निवड करण्यात आली. तीन हजार रुपये प्रती सायकल प्रमाणे ६६६ सायकलींसाठी १९ लाख ९८ हजार रुपयाचे अनुदान तालुक्याला वाटप करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावाने निवड झालेल्या लाभार्थी संख्येनुसार धनादेश सत्राच्या सुरुवातीला (जून) पाठविण्यात आल्याचे पंचायत समिती कार्यालयातून सांगण्यात आले. २ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा विद्यार्थिनींना अजुनपर्यंत सायकल वाटपच करण्यात आल्या नाही अशी पालकांची ओरड आहे. मिळालेल्या माहितीनूसार आजपर्यंत फक्त २१९ सायकल वाटप करण्यात आल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. परंतु शाळांच्या ५० टक्के मुख्याध्यापकांनी सायकल वाटप केल्याचे सध्यातरी दिसून येत नाही. तालुकास्तरावरील मानव विकास कार्यक्रमाचे अध्यक्ष बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Free cycle passing delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.