तीन महिने मिळणार मोफत सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:00 AM2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:06+5:30
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधित जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार आहे.
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ च्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचे वाटप करताना १४.२ किलो वजनाचे सिलिंडर मिळणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात १ तर ५ किलो वजन सिलिंडरच्या लाभार्थ्यांना १ महिन्यात जास्तीत जास्त ३ तर ३ महिन्यात एकूण ८ सिलिंडर दिले जाणार आहेत. १४.२ किलो सिलिंडरच्या लाभार्थ्यांना अंतिम सिलिंडर मिळण्याच्या १५ दिवसानंतर तर ५ किलो सिलिंडरच्या लाभार्थ्यांना ७ दिवसानंतर पुढील सिलिंडर मिळण्यासाठी नोंदणी करता येईल. सिलिंडरची आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्यांना आॅर्डर क्र मांक पाठविण्यात येणार आहे.
या ऑर्डर क्रमांकाची ऑईल कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होणार आहे. त्यांतर्गत कॅश मेमो काढल्यानंतर ग्राहकांना एका एसएमएस संदेशाद्वारे कोड क्रमांकाची तथा द्यावयाच्या रक्कमेची माहिती देण्यात येईल. हा क्रमांक एजंसीचा जो व्यक्ती सिलिंडर घेऊन आलेला असेल त्याला सांगून गॅस सिलिंडर स्वीकारायचा आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी उज्ज्वला योजनेचा लाभ घ्यावा.
विशेष म्हणजे, ही सेवा घरपोच दिली जाणार असल्याने कुणीही घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.