मोफत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांची अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:20+5:30
तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नियमित स्वस्त धान्य देण्याकरिता जे स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वाटप करतात त्याच रेशन दुकानदाराकडून नियमित रेशनच्या व्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु सडक अर्जुनी येथे मोफत तांदूळ वाटप अद्याप सुरु झालेले नाही. ग्राहकांनी विचारणा केली असता ग्राहकांशी उद्धटपणे व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याची लिखित तक्रार गावकऱ्यांनी सडक अर्जुनीचे तहसीलदार उषा चौधरी यांच्या नावे दिली आहे.
सडक अर्जुनी येथील शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला मोफतचे प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ मिळेल यासाठी रविवार (दि.१२) सकाळी ९ वाजता एकच गर्दी केली. परंतु स्वस्त धान्य दुकान उघडले नाही. शिधापत्रिकाधारक एक तासापर्यंत स्वस्त धान्य दुकानादाराची वाट बघत होते. त्यानंतर काही ग्राहकांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्या कार्ड धारकांना अरेरावीची भाषा वापरुन धमकी वजा बोलण्यात आल्याचा आरोप केला आहे. शेकडो शिधापत्रिकाधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.परंतु कलम १४४ लागू असल्यामुळे त्यांनी तहसीलदार सडक अर्जुनी यांच्याकडे तक्रार करुन मोफत धान्याचे लवकर वाटप करण्यात यावे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई मागणी केली आहे.
तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्यामुळे स्वस्त धान्य वितरकांच्या मनात काही तरी वेगळेच असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्यांची तक्रार करण्यात येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.
सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पुरवठा अधिकारी देखील काम करतात.
लाभार्थ्यांना जर स्वस्त धान्याचा लाभ नियमित व वेळेवर मिळत नसेल तर अशा अधिकाºयांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे व शासनाच्या योजनांचे पालन झाले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
एकच वितरक करतो चार दुकानाचे वाटप
वडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारे यांच्या दुकानालाच सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान जोडण्यात आले आहे. एकच वितरक चार दुकानाचे वाटप करीत असेल तर एकाच वेळी अनेक शिधापत्रिकाधारकांची गर्दी होईल आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’या नियमांचा फज्जा उडेल. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे तहसील प्रशासन कोणती काळजी घेवून उपाययोजना करतील याकडे देखील नागरिकांचे लक्ष आहे.
एकाच स्वस्त धान्य वितरकाकडे वडेगावचे एक आणि सडक अर्जुनीचे तीन स्वस्त धान्य दुकान असल्यामुळे आणि मोफत मिळणारे धान्य उशीरा आल्यामुळे ते शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचले नाही. याची मी लवकरच चौकशी करते. सर्व लाभार्थ्यांना मोफत तांदूळ मिळेल.
- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी