९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:53 PM2019-06-06T23:53:31+5:302019-06-06T23:54:25+5:30

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Free the irrigation of 90 thousand hectare farming | ९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा

९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देधापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ : प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर शेत जमिन सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यास मदत होणार आहे.
तिरोडा तालुक्यातीलच नव्हे तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील हरितक्रांतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार सिंचन प्रकल्प म्हणून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ या प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे गोंदिया जिल्ह्यातील ८० हजार ७२६ आणि भंडारा जिल्ह्यातील ९ हजार ४२० हेक्टर अशी एकूण ९० हजार १४६ हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे.
या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना बरेचदा एका पाण्याने पिके गमवावी लागतात. तर पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शिवाय रब्बी पिके घेण्यापासून सुध्दा वंचित राहावे लागत आहे. मात्र या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिके घेण्यास मदत होणार असून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे काही प्रमाणात शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होवून त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होवून हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन शासनाकडून या प्रकल्पासाठी ९१७ कोटी ३ लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. आत्तापर्यंत या प्रकल्पावर ६११ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला असून प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मंगळवारी या सर्व कामाची आ.रहांगडाले यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
या वेळी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पृथ्वी फाळके, उपभियंता पंकज गेडाम, तिरोडा तालुक्यातील सर्व पत्रकार, माजी उपसभापती व भाजपा विधानसभा प्रमुख डॉ.वसंत भगत, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, युवा मोर्चा महामंत्री संजू पारधी, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष गौरी पारधी, कृ.ऊ.बा.स.संचालक चत्रभुज बिसेन, तिरु पती राणे प्रामुख्याने उपस्थित होते.

पाईप लाईनचे काम ४० टक्के पूर्ण
धापेवाडा टप्पा क्र .१ चे पाणी खळबंदा जलाशयात यशीस्वरीत्या सोडण्यात आले आहे. लाभ क्षेत्रांअंतर्गत १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. टप्पा २ द्वारे बोदलकसा, चोरखमारा, भदभद्या, संग्रामपूर, रिसाला या तलावात २ मीटर व्यासाच्या पाईप लाईनद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
वैनगंगा नदीकाठावरील दुसºया टप्प्याच्या पंपहाऊसच्या कामाला मंगळवारी (दि.३) आ.विजय रहांगडाले यांनी अधिकारी आणि पत्रकारांसह भेट देऊन पाहणी केली.या ठिकाणी ८ पंप बसविण्यात येणार असून चार पंपाद्वारे बोदलकसा जलाशयात तर दोन पंपाद्वारे चोरखमारा जलाशयात पाणी सोडण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाईप लाईन जाईल त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आ.रहांगडाले यांनी सांगितले.

तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये, खरीपासह रब्बीचे पीक घेता येऊन त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम लवकारत लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाने निधी मंजूर केला असून निधीची कमतरता भासणार नाही. लवकरच या परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर होईल.
- विजय रहांगडाले,
आमदार तिरोडा.

Web Title: Free the irrigation of 90 thousand hectare farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.