कोहमारा-मुरदोली मार्गावर चार बछड्यांसह वाघिणीचे दर्शन, प्रवाशाने टिपला मुक्तसंचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:09 PM2023-04-05T15:09:01+5:302023-04-05T15:39:20+5:30
कोहमारा-मुरदोली मार्गावरुन येताना घ्या काळजी, वन विभागाची सूचना
गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया- कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल परिसरातून मंगळवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास एक वाघीण आणि तिचे चार बछडे अचानक मुख्य रस्त्यावर आले. हे पाहून या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना धक्काच बसला. हळूहळू वाघीण आणि बछड्यांनी रस्ता ओलांडल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
सडक अर्जुनी तालुक्यातील मुरदोली जंगलाचा परिसर हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या ठिकाणी वाघ, बिबट्यांसह वन्यप्राण्यांचे नेहमीच दर्शन होत असते. बरेचदा उन्हाळ्याच्या दिवसत रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचे गावकऱ्यांना आणि रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दर्शन होत असते.
मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावर एक वाघिणी तिच्या चार बछड्यांसह रस्ता ओलांडताना या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आढळली. दरम्यान अचानक रस्त्यावर वाघिण आणि तिचे चार बच्छडे रस्त्यावर आल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये धडकी भरली होती. दरम्यान एका प्रवाशाने हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. या परिसरात शेती आणि वाघोबाचे मंदिर असल्यामुळे येथे पाळीव जनावरे आणि पर्यटकांचा वावर असतो. हे पाहता वनविभागाने तातडीने प्रवासी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजावे, अशी मागणी होत आहे.
मंगळवारी रात्री दर्शन झालेल्या वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचे ‘लोकेशन’ त्याच परिसरात असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या मार्गावरून ये-जा करताना सतर्कता बाळगावी अशी सूचना सुध्दा वन विभागाने कली आहे.