दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:55 PM2017-12-12T22:55:54+5:302017-12-12T22:56:13+5:30
येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण यासाठी लागणाऱ्या कॉलेज इमारतीमधील पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील दोन नवीन अभ्यासक्रमांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण यासाठी लागणाऱ्या कॉलेज इमारतीमधील पहिल्या माळ्याच्या बांधकामासाठी ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या येत्या पुरवणी बजेटमधून हा निधी मंजूर केला जाणार असून त्यानंतर १२ चौ.फुटाच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम केले जाणार आहे.
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदियाला गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज लाभले व सन २०१३ मध्ये चार अभ्यासक्रम व २४० विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन कॉलेज सुरू करण्यात आले होते. कॉलेज इमारतीसाठी आमदार अग्रवाल यांनी फुलचूरपेठ येथे शासकीय जमीन व २० कोटींचा निधी मंजूर करविला होता. पहिल्या वर्षी चार अभ्यासक्रम व २४० विद्यार्थी असतानाच सन २०१४ मध्ये सिव्हील व इलेक्ट्रीकल हे दोन अतिरीक्त अभ्यासक्रम आमदार अग्रवाल यांनी मंजूर करवून घेतले. परिणामी प्रत्येक वर्षी २४० ऐवजी ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला व या ३६० जागांमधील एकूण ७० टक्के म्हणजेच २५२ जागा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षीत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगारान्मुख शिक्षण मिळावे यासाठी आमदार अग्रवाल आणखी दोन अभ्यासक्रम सुरू करविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र कॉलेज इमारतीत जागा नसल्याने त्यांना यात अडचण येत होती. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी इमारतीच्या पहिल्या माळ््याच्या बांधकामासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे २० जून रोजी बांधकामाला मंजूरी मिळाली.
मात्र निधीसाठी काम अडून पडल्याने आमदार अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. परिणामी पहिल्या माळ््याच्या बांधकामासाठी राज्याच्या पुरक बजटमध्ये ३.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून वितरीत केला जाणार आहे.
यामुळे कॉलेज इमारतीतील १२ चौ.फूट जागेत पहिल्या माळ््याचे बांधकाम होणार. तसेच दोन नवे अभ्यासक्रम येणार असल्याने आणखी १२० विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देता येणार आहे.