‘मटका कोला’ची नि:शुल्क सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 01:26 AM2017-03-31T01:26:22+5:302017-03-31T01:26:22+5:30

उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे.

Free service of 'Matka Kola' | ‘मटका कोला’ची नि:शुल्क सेवा

‘मटका कोला’ची नि:शुल्क सेवा

googlenewsNext

गोंदिया रेल्वे स्थानक : तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळ कंठांना गारवा
गोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने वाढत्या उन्हासोबत पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. विहिरी व बोअरवेल्समधील पाणी खोलात जात आहे. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकावर ‘मटका कोला’ची नि:शुल्क जलसेवा आता प्रवाशांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर तहानलेल्या प्रवाशांच्या व्याकुळ
कंठांना शीतलता मिळत आहे.
श्री रणछोडदास महाराज यांच्या प्रेरणेने सन १९७० मध्ये नगर नागरिक सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख कुमारभाई माचिसवाले आहेत. त्यांच्या सहकार्याने दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर मटका कोला या नि:शुल्क जलसेवेद्वारे प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ही समिती सन १९७० पासून अविरतपणे रेल्वे स्थानकावर पाणी वितरणाची सेवा नि:शुल्कपणे देत आहे.
दरवर्षी गोंदिया रेल्वे स्थानकावर तीन ठिकाणी ही नि:शुल्क जलसेवा कार्यरत असून प्रवाशांची तहान भागवित आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म-३ व ४ वरच्या एका टोकावर थंड पाण्याने भरलेले ३० ते ४० मोठमोठे घडे (नान) ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या टोलावरही थंड पाण्याने भरलेले मटके ठेवण्यात आले आहेत. तिसऱ्या ठिकाणीसुद्धा लवकरच मटका कोला सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी १५ नानची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर नागरिक सेवा समितीच्या वतीने नि:शुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रायपूर ते नागपूर या रेल्वे प्रवासादरम्यान गोंदिया हेच एकमेव असे रेल्वे स्थानक आहे, जेथे प्रवाशांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसांत नि:शुल्कपणे उपलब्ध करून दिले जाते. या मटका कोलाचे पाणी वितरण करण्यासाठी गोंदिया शहर व लगतच्या ग्रामीण परिसरातील हिवरा, कटंगीकला व इतर गावातील मुले-मुली, महिला व पुरूष येतात. त्यांना नगर नागरिक सेवा समितीकडून आठवडी किंवा मासिक वेतनही दिले जाते.काही जण तहानलेल्यांना पाणी पाजणे म्हणजे पुण्यकार्य आहे, अशी धारणा ठेवून नि:शुल्क पाणी वाटपाचे काम करीत आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावर नि:शुल्क जलसेवेच्या ठिकाणी आळीपाळीने सात जणांना पाणी वितरणासाठी ठेवण्यात आले आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. या नि:शुल्क जलसेवेमुळे गोंदिया रेल्वे स्थानक प्रवाशांना सुपरिचित झाले आहे.
रेल्वेगाडीत बसणारे प्रवासी ज्यांना गोंदियात उतरायचे नसते, ते सुद्धा गोंदिया स्थानकावर उतरून आपली तहान भागवितात. तसेच पुढील प्रवासासाठी आपल्या जवळच्या बाटल्या येथील थंडगार पाण्याने भरून नेतात.
तेच पाणी त्यांच्या पुढील प्रवासात पिण्यासाठी उपयोगी ठरते.विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर नागरिक सेवा समिती तहानलेल्या प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Free service of 'Matka Kola'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.