नऊ सरकारी रुग्णालयांत फ्री, तर सहा खासगी रुग्णालयांत अडीशे रुपयांत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:28+5:302021-03-01T04:33:28+5:30
गोंदिया : केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजाराच्या ४५ वर्षांवरील रुग्णांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्याचा ...
गोंदिया : केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजाराच्या ४५ वर्षांवरील रुग्णांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचासुद्धा सहभाग वाढविण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील नऊ सरकारी रुग्णालयात फ्री आणि सहा खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यासाठी कोविन आणि आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. या ॲपवर नोंदणी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाणार आहे. यासाठी किती लसीकरण केंद्र असावे, काय सुविधा असाव्यात यासंदर्भात आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी व्हिडिओ कान्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. रविवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची यादी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारीसुद्धा थोडे संभ्रमात होते.
........
नोंदणी कशी करणार
कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना कोविन आणि आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करता येणार आहे. यासाठी त्यांना जवळच्या आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आरोग्य विभागाच्या संबंधित संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे. यासाठी त्यांना आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्र आदी घेऊन जावे लागणार आहे.
...........
कोणाला मिळणार लस
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे, तसेच इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ या वयाेगटातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना लसीकरण करण्यात येणार नाही.
........
खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी पूर्ण कराव्या लागणार बाबी
शासकीय रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण मोफत करण्यात येणार आहे, तर जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी २५० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. शहरातील सहा खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली असली तरी त्यांना आरोग्य विभागाने सुचविलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर करावे लागणार आहे. त्यानंतर लसीकरण करता येणार आहे.
.....
येथे मिळणार कोरोना लस
सरकारी रुग्णालय
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय
तिरोडा उपजिल्हा रुग्णालय
बाई गंगाबाई महिला रुग्णालय
देवरी ग्रामीण रुग्णालय
आमगाव ग्रामीण रुग्णालय
अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालय
सालेकसा ग्रामीण रुग्णालय
गोरेगाव ग्रामीण रुग्णालय
.......
खासगी रुग्णालय
बालाजी नर्सींग होम गणेशनगर गोंदिया
ब्राह्मणकर हॉस्पिटल मामा चौक
राधाक्रिष्णा क्रिटुकल केअर गोंदिया
गोंदिया केअर हॉस्पिटल गोंविदपूर रोड गोंदिया
न्यू गोंदिया हॉस्पिटल बजरंग नगर गोंदिया
रिलायन्स हॉस्पिटल गोंदिया
.....................