शौचालय बांधकामाचा मार्ग मोकळा
By admin | Published: January 22, 2017 12:48 AM2017-01-22T00:48:21+5:302017-01-22T00:48:21+5:30
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नागरी शौचालय बांधकामासाठी शासनाकडून
११०१ लाभार्थ्यांची यादी बँकेत : लवकरच होणार कामे सुरू
गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नागरी शौचालय बांधकामासाठी शासनाकडून नगर परिषदेला एक कोटी चार लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे निधीअभावी अडून पडलेल्या ११०१ शौचालयांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून पहिल्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची यादी बॅँकेत पाठविण्यात आली आहे. अशात लवकरच या शौचालयांचे बांधकाम सुरू होणार आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे. याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
गोंदिया शहर जिल्ह्याचे ठिकाण असले तरी आजही येथील कित्येकांकडे वैयक्तीक शौचालय नाहीत. ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचाचा प्रकार असतो हे खरे नाही. कारण शहरातही उघड्यावर कमी मात्र सार्वजनिक शौचालयांचा आधार वैयक्तीक शौचालय नसलेल्या परिवारांना घ्यावा लागत असल्याचे मात्र सत्य आहे. या प्रकारावर पूर्णपणे विराम लागावा व प्रत्येकाकडे वैयक्तीक शौचालय असावे. जेणेकरून शहरी नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्या व सोबतच शहरातील वातावरणही स्वच्छ असावे, हाच उद्देश धरून केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. तर या अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात असून त्यातूनच नागरी शौचालय बांधकामाची मोहीम राबविली जात आहे.
शहरात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत पूर्वी मिळालेला निधी संपल्याने शौचालयांचे काम अडले होते. दरम्यान शासनाकडून एक कोटी चार लाख रूपयांचा निधी पालिकेला मिळाला आहे. या निधीतून अडून पडलेल्या ११०१ शौैचालयांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना पहिला हप्ता द्यावयाचा असून त्याची यादी बँकेला पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार व लवकरच त्यांच्या शौचालयांचे काम सुरू होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
८७ लाखांचा निधी वितरित
पालिकेकडे आतापर्यंत ४१३० अर्ज आले आहेत. पालिकेला २७५१ शौचालयाचे उद्दीष्ट आहे. तर आलेल्या अर्जांची तपासणी करून १७५० लाभार्थ्यांना पहिला हप्ता व १३०० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला होता. निधी संपल्याने ४५० लाभार्थी दुसऱ्या हप्त्यासाठी अडून होते. मात्र आता निधी आल्याने नवीन शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी पहिला हप्ता व या ४५० लाभार्थ्यांना त्यांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे. अशात आलेल्या निधीतील ८७ लाख रूपये वितरीत करण्यात आले आहे. मात्र आणखी निधीची गरज असल्याने पालिकेला शासनाकडे मागणी करावी लागणार आहे.