अंडरग्राउंड, एबी केबलचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 09:37 PM2017-09-08T21:37:18+5:302017-09-08T21:38:04+5:30
वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आता अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरीयल बंच) केबलने वीज पुरवठा करणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत (आयपीडीएस) जिल्ह्याला २८.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हयातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च व लघुदाब वाहिन्या (केबल) टाकल्या जाणार असून दोन टप्यात विभाजण्यात आलेल्या या योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून वीज चोरी पकडण्यासाठी किंवा थकबाकीची वसूली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांना मारहाण व शिवीगाळ करण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. शिवाय मनुष्यबळाची कमतरता यामुळे दैनंदिन कामात महावितरण कोठेतरी कमी पडत आहे. परिणामी वीज चोरीच्या घटनांवर आळा पूर्णपणे यशस्वी झालेले नाही. यामध्ये आकडा टाकून वीज चोरी ही उघड बाब आहे. वीज चोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता महावितरणने कठोर पाऊले उचलली आहे. वीज चोरीच्या घटनांवर घालण्यासाठी व उघड्यावर वीज पुरवठा करणाºया वाहिन्यांमुळे अपघात होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने वेगळी पाऊले उचलली आहे. महावितरण आता अंडरग्राऊंड (भूमिगत) केबल टाकणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकता येणार नाही, अशा भागांत एबी केबलच्या (एरियल बंच) माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड केली आहे. यात गोंदियासाठी १८ कोटी ३८ लाख तर तिरोड्यासाठी नऊ कोटी ८२ लाख अशी एकूण २८ कोटी २० लाख रूपयांची तरतूद केली आहे.
निविदेला ८ वेळा मुदतवाढ
या योजनेंतर्गत तीन उपकेंद्र त्यासाठी लागणारी उच्चदाब वाहिनी, उपकेंदातून निघणारी वाहिनी, उपकेंद्र क्षमतावाढ आदि कामे मुख्य कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. तर एरीयल बंच केबल व लघुदाब वाहिनीची कामे परिमंडळस्तरावर असल्याने योजना भाग - १ व भाग-२ अशा दोन भागांत विभागण्यात आली आहे. यासाठी महावितरणने निविदा काढली. मात्र निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने सलग ८ वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आता ९ व्या वेळेत प्रतिसाद मिळाल्याने कंत्राटदारांना एप्रिल महिन्यात कार्यादेश देण्यात आले असून येत्या दिड वर्षात त्यांना हे काम पूण करायचे आहे.
उच्चदाब व लघुदाब वाहिनी टाकणार
या योजनेंतर्गत उच्चदाब वाहिनीसाठी गोंदिया शहरात ४ किमी. तर तिरोडा शहरात ३ किमी. चे नियोजन करण्यात आले आहे. तर लघुदाब वाहिनीसाठी अंडरग्राऊंड अंतर्गत गोंदियात १० किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. यात तिरोडा शहरात लघुदाब वाहिनी सध्यातरी टाकली जाणार नाही. तर जेथे शक्य होणार नाही अशा भागांत एरीयल बंच केबल टाकले जाणार आहे. यासाठी गोंदियात १४ किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे.गोंदिया शहरात माताटोली व रिंगरोड तर तिरोडात चुरडी रोड असे तीन नवे उपकेंद्र (सबस्टेशन) तयार केले जाणार आहेत. तसेच पार्वतीघाट, भिमघाट व सुर्याटोला उपकेंद्रांची क्षमता वाढ केली जाणार आहे.
काय आहे अंडरग्राऊंड व एबी केबल
अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी केबल ही दोन कामे महावितरण करणार आहे. यात अंडरग्राऊंड केबल अंतर्गत गोंदियात चार किलोमीटर व तिरोडात ती किलोमीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी व १० किलोमीटर लघुदाच भूमिगत वाहिनी गोंदियात टाकली जाणार आहे. अंडरग्राऊंड केबलमध्ये जमिनीच्या आतून केबल टाकले जाणार आहे. जेणेकरून आकडा घालण्याचा प्रकार बंद होऊन कुणालाही वीज चोरी करता येणार नाही. तसेच एबी केबल म्हणजे हे विशिष्ट प्रकारचे केबल आहे. या केबलच्या आत मध्ये वीज पुरवठा करणारे तार राहणार असून त्यावर कोट राहणार.
या भागात टाकले जाणार केबल
लघुदाब वाहिनी (अंडरग्राऊंड)
जयस्तंभ चौक - चांदनी चौक
गांधी प्रतिमा - रेल्वे स्टेशन
कुडवा रोड - मटन मार्केट
दुर्गा चौक - इंदिरा गांधी स्टेडियम
श्री टॉकीज - जैन फर्निचर
पोलीस स्टेशन - सब्जी मंडी व जयस्तंभ चौक
एरीयर केबल बंच
भिमनगर
४ संजयनगर
रामनगर बाजार चौक
मोक्षधाम मार्ग