६२ बसेसमध्ये नि:शुल्क वाय-फाय
By admin | Published: April 1, 2017 02:18 AM2017-04-01T02:18:43+5:302017-04-01T02:18:43+5:30
सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे.
लांब पल्ल्यांच्या दोन गाड्या सुरू : १५ एप्रिलनंतर मानव विकासच्या बसेस प्रवासी सेवेत
देवानंद शहारे गोंदिया
सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. त्यातच गोंदिया आगारातील ६२ बसेसमध्ये ही सेवा प्रवाशांसाठी नि:शुल्क सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित बसेसमध्येसुद्धा पुढील आठवड्यापर्यंत वाय-फाय सेवा सुरू होणार आहे.
आता लग्न सराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ही बाब हेरून राज्य परिवहन महामंडळाने उन्हाळी बसेसचे नियोजन व बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २८ बसेस व इतर ६५ अशा एकूण ९३ बसेस आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६२ बसेसमध्ये नि:शुल्क वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे तर तीन बसेस पुनर्बांधनीसाठी (रिकन्स्ट्रक्शन) आगाराच्या कार्यशाळेत आहेत. उर्वरित २८ बसेसमध्येसुद्धा पुढील आठवड्यापर्यंत प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांनी सांगितले.
या उन्हाळ्यात आता लग्न सराईचा हंगाम बघता गोंदिया आगाराने लांब पल्ल्याच्या दोन बसेस २२ मार्चपासून सुरू केल्या आहेत. गोंदिया-काटोल ही हॉल्टींग बस दुपारी ४.१५ वाजता गोंदिया आगारातून सुटते व काटोल येथे मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता गोंदिया आगारात पोहोचते. तसेच गोंदिया-नागपूर ही बस गोंदिया आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटते व त्याच दिवशी रात्री १० वाजतापर्यंत गोंदिया आगारात परतते. या लांब पल्ल्याच्या बससेवेमुळे प्रवाशांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
याशिवाय गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २८ स्कूल बसेस आहेत. मुलींची शालेय परीक्षा आटोपल्यानंतर त्या स्कूल बसेस १५ एप्रिलनंतर प्रवासी सेवेत लावण्यात येणार आहेत. या बसेस जिल्ह्यांतर्गतच धावणार असून त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या उन्हाळ्यात गोंदिया आगाराचे उत्पन्न निश्चितच वाढणार आहे.