शुक्रवारचा आकडाही एक अंकीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:43+5:302021-01-23T04:29:43+5:30
गोंदिया : गुरूवारी फक्त ८ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असतानाच शुक्रवारीही (दि.२२) जिल्ह्यात ९ नवीन बाधितांची भर पडल्याची ...
गोंदिया : गुरूवारी फक्त ८ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असतानाच शुक्रवारीही (दि.२२) जिल्ह्यात ९ नवीन बाधितांची भर पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आलेला हा एक अंकी आकडा जिल्हावासियांसाठी दिलासादायक असून यावरून कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर आता कोरोनाचा जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी आढळून आलेल्या ९ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५, तिरोडा २, सालेकसा १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रूग्ण आहे. तसेच २२ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १३, तिरोडा २, गोरेगाव ३, देवरी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रूग्ण आहेत. यानंतर मात्र आता जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १४,०६३ झाली असून १३,७६२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १४० रूग्ण क्रियाशील आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ७६, तिरोडा १२, गोरेगाव ३, आमगाव २३, सालेकसा १३, देवरी ४, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव ४ तर इतर जिल्हा व राज्यातील २ रूग्ण आहेत.
--------------------------
जिल्ह्यात १,२५,४५१ कोरोना चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १,२५,४५१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६१,३०५ आरटी-पीसीआर चाचण्या असून यामध्ये ८,३०५ पॉझिटिव्ह तर ४९,४६४ निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रकारे ६४,१४६ रॅपिड ॲंटीजेन असून ६,०६५ पॉझिटिव्ह तर ५८,०८१ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचा दर ९६.८८ टक्के असून मृत्यू दर १.२० टक्के एवढा आहे.
------------------
६६ रूग्ण घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १४० क्रियाशील रूग्णांची नोंद घेतली गेली असून यातील ६६ रूग्ण घरीत विलगीकरणात आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४१, तिरोडा ४, गोरेगाव १, आमगाव ९, सालेकसा ७, देवरी १, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रूग्ण आहेत.