भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’

By Admin | Published: September 14, 2016 12:22 AM2016-09-14T00:22:01+5:302016-09-14T00:22:01+5:30

आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही?

Friendship ' | भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’

भरकटलेल्या पावलांना सावरतेय ‘मैत्री’

googlenewsNext

१८८७ जणांचे समुपदेशन : ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेश
नरेश रहिले गोंदिया
आपल्या पाल्यांच्या मनात येणाऱ्या वाईट विचारांमुळे आपण त्रस्त आहात? आपला मुलगा, मुलगी संकुचित वृत्तीमुळे आपल्याशी बिनधास्त बोलू शकत नाही? आपण त्यांच्या भविष्याला घेऊन चिंताग्रस्त आहात? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर काळजीचे कारण नाही. त्या बालकांच्या शंका-कुशंकांचे समाधान करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने समुपदेशन ‘मैत्री’ संवाद केंद्र कार्यरत झाले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाव्यतिरिक्त जिल्हाभरातील किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्याचे समाधान या ‘मैत्री’तून केले जात आहे. आतापर्यंत यातून १८८७ मुलामुलींचे समुपदेशन केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ‘मैत्री’ संवाद केंद्रात या प्रकारच्या समस्येने ग्रस्त मुले-मुली दाखल होतात. बालकांच्या विक्षिप्त कृत्याची तक्रार शिक्षक-पालकांकडून केली जाते. परंतु त्यात चुक त्या मुला-मुलींची नसते. वाढत्या वयासोबत त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होतात. या बदलाला सांभाळताना अनेक समस्या येतात.
या समस्येचे योग्य समाधान करण्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते स्वत:च समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून ते चुकीच्या मार्गावरही जातात.
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १० ते १९ वर्षातील मुला-मुलींसाठी ‘मैत्री’ संवाद व सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बाई गंगाबाई महिला रूग्णालय मध्ये गुरुवार, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात बुधवारी व देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात शुक्रवारी ही सेवा दिली जात आहे.

वेळेवर मार्गदर्शन गरजेचे
किशोरवयीन बालकांच्या समस्येवर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. बालकांच्या समस्या समाधानासाठी ‘मैत्री’ संवाद केंदाकडून आश्रमशाळा, झोपडपट्टी परिसर, शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाते. बालकांच्या समस्यांना घेऊन काही पालक व शिक्षक ‘मैत्री’ संवाद केंद्रात येतात. परंतु बालक आपल्या पाल्यांसामोर मनमोकळ्या पणाने बोलत नाहीत. अश्यावेळी त्या बालकांसोबत एकट्यात बोलले जाते. किंवा आपल्या समस्या कागदावर लिहून दिले जाते.
१८८७ मुले-मुली योग्य मार्गावर
अर्श कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते आॅगस्ट अखेरपर्यंत १८८७ मुला-मुलींना ‘मैत्री’ संवाद केंद्रातून मार्गदर्शन करण्यात आले. यात ९५२ किशोर व ९३५ किशोरींचा समावेश आहे. आॅगस्ट महिन्यात २६० युवक व २४२ युवतींना या केंद्राच्या माध्यमातून चांगल्या मार्गावर आल्या. एप्रिल ते आॅगस्ट अखेर जिल्हा सामान्य रूग्णालयात ७४४, महिला रूग्णालय ५१६ तिरोडा उपजिल्हा रूग्णालय २८८, देवरी ग्रामीण रूग्णालयात ३९९ युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यात आले.
यामुळे होतात समस्या
किशोरवयीन मुला-मुलींच्या हातात आता स्मार्ट फोन आला आहे. इंटरनेटचा सर्रास होत असलेला वापर, टी.व्ही. चॅनलवर जे दाखवायला नको ते दाखविले जाते. त्यामुळे वाटईट कृत्य करण्याचा प्रयत्न प्रौगंडावस्थेतील मुले-मुली करतात.यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. शाळांमध्येही या प्रकारच्या समस्या वाढत आहेत. बालके प्रौढ व्यक्तीसारखा व्यवहार करतात. या प्रकरातून लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर येतात.

‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून किशोर-किशोरी यांना शारीरिक, मानसिक व लैंगिक आरोग्यासंदर्भात माहिती दिली जाते. मोफत हिमोग्लोबीन, रक्त व सिकलसेल तपासणी करण्यात येते. विवाह पूर्व मार्गदर्शन, आहार विषयक मार्गदर्शन व रक्ताची कमतरता यावर उपचार केला जातो. मुलींना मासिक धर्म आजारासंदर्भात माहिती दिली जाते. प्रजनन व लैंगिक आजारासंबंधी प्रतिबंधक आरोग्य शिक्षण व उपाय योजना केली जाते. हे सर्व गुप्त ठेवले जाते.

Web Title: Friendship '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.