मजुरांचा पंचायत समितीवर मोर्चा

By admin | Published: February 10, 2017 01:17 AM2017-02-10T01:17:34+5:302017-02-10T01:17:34+5:30

जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या मजुरांना पाहिजे त्या प्रमाणात मजुरी दिली जात नाही.

Front of Majra Panchayat Samiti | मजुरांचा पंचायत समितीवर मोर्चा

मजुरांचा पंचायत समितीवर मोर्चा

Next

कालव्याच्या कामात गौडबंगाल : निवदेनातून केली कारवाईची मागणी
परसवाडा : जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या मजुरांना पाहिजे त्या प्रमाणात मजुरी दिली जात नाही. परिणामी मजुरांमध्ये असंतोष असल्याने करटी बु. ते डब्बेटोला या कालव्याच्या कामावर काम करीत असलेल्या मजुरांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी मजुरांनी खंड विकास अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांपुढे आपली आपबिती मांडत त्यांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत करटी बु. अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १८ जानेवारीपासून करटी बु. ते डब्बेटोला नहराचे काम सुरु झाले. सदर नहर खैरबंदा जलाशयाचे असून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ने काम सुरु केले आहे. सदर कामावर दररोज ३५० ते ३७५ मजूर काम करतात. पण हजेरी पत्रकात ४८८ मजुरांची नोंद आहे. २३/१/२०१७ ला पहिला हप्ता संपला.
पण रोजगार सेवक जागेश्वर बघेले व कनिष्ठ अभियंता मग्रारोहयो यांनी मोजमाप न करता मोजमाप पुस्तीकेत गॅगनिहाय ४० ते ६० रुपये अल्प मजुरी काढली. सदर काम ज्या ठिकाणी आहे तेथे दगड, मुरुम असून कालव्याची खोली २५ ते ३० फुट खोल पहाडी क्षेत्र आहे. त्यांना लीड व दगड मुरुम खोदकामाचे पैसे दर न देता माती काम केल्याची मजुरी देण्यात आली.
कनिष्ठ अभियंता सुनिल पारधी यांनी १५० ते १६० रुपये मजुरी देण्यात येईल असे लेखी स्वरूपात मजुरांना लिहून दिले. तरी ४० ते ६० रुपये मजुरी देण्यात आली. यासाठी करटी बु. येथील मजुरांनी अन्याय झाला असल्याचे आपली मागणीसाठी तिरोडा पंचायत समिती कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यात मोठा घोळ झाल्याचे मजुरांनी आपली आपबीती खंडविकास अधिकारी दुबे व मग्रारोहयोचे विस्तार अधिकारी कांबळे यांना लेखी तक्रारी नुसार दिली. यावर कांबळे यांनी, १९२ रुपये मजुरीचे दर असल्याचे मजुरांना सांगितले. मात्र अल्प मजुरी कशी असा प्रश्न मजुरांना पडला आहे. चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याचे व १९२ रुपये मजुरी देण्यात येईल असे आश्वासन कांबळे यांनी मजुरांना दिले.
रोजगार सेवकाच्या नावातही घोळ
ग्रामसभेत रोजगार सेवक विनायक शामलाल बघेले यांची निवड करण्यात आली होती. पण विनायकचे लहान भाऊ जागेश्वर बघेलेच कार्यालयात व मग्रारोहयोचे काम करीत असतात. जागेश्वर बघेले यांची कधी रोजगार सेवकपदी निवड झाली, नाव कधी बदलविण्यात आले, नियुक्ती न करता कार्यभार देण्यात आला, हे ग्रामपंचायत व ग्रामसेवकालाच ठाऊक.
रोजगार सेवक मजुरांकडून पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही म्हणून मजुरी कमी काढणार असल्याचे रोजगार सेवक कार्यरत बघेले बोलले. सदर कामात घोळ झाला असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Front of Majra Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.