राज्यमंत्रिपदापाठोपाठ फुके यांच्याकडे दोन जिल्ह्याचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:54 PM2019-07-05T23:54:48+5:302019-07-05T23:55:21+5:30
अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अल्पावधीत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप सोडणारे डॉ.परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले. दांडगा जनसंपर्क, अभ्यासू व्यक्तीमत्व आणि मितभाषी असलेल्या डॉ. परिणय फुके यांनी दोन्ही जिल्ह्यातील भाजपा नेत्यांना एकत्र आणून लोकसभेचा गढ सर केला होता. त्याच कामाची ही पावती असून विधानसभेची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच राहणार असल्याचे संकेत पालकमंत्रीपदाची जबाबदारी देऊन अप्रत्यक्षपणे देण्यात आले आहे.
डॉ. परिणय फुके यांनी नागपूर महानगरपालिकेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.नगरसेवक असताना त्यांनी विकास कामांचा धडाका लावला.अडीच वर्षापुर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात आली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करीत ते विधान परिषदेत पोहचले. अल्पावधीत त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आपल्या कार्यातून ठसा उमटवला.सर्वप्रथम या दोन जिल्ह्यात विखुरलेल्या भाजपा नेत्यांना एकत्र आणले. त्यामुळेच लोकसभेचा गढ सर करणे भाजपाला शक्य झाले. दांडग्या जनसंपर्काच्या भरोशावर त्यांनी आपली छाप सोडली. विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. मागील ६० ते ७० वर्षांपासून रेंगाळलेला नझुल पट्ट्यांचा प्रश्न डॉ.परिणय फुके यांनी अवघ्या महिनाभरात सोडविला.त्यामुळे हजारो नझुल पट्टेधारकांना दिलासा मिळाला. यासह त्यांनी अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. फुके यांच्यावर लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्यात होती. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दोन महिने या मतदारसंघात तळ ठोकून योग्य नियोजन केले. त्यामुळेच राष्टÑवादीच्या ताब्यातील मतदारसंघ पुन्हा एका भाजपा ताब्यात घेत वर्चस्व स्थापन केले. भाजपाला या मतदारसंघात मिळालेल्या यशात डॉ.फुके यांचा वाटा कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळेच गत १५ दिवसापूर्वी राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम वने आणि आदिवासी विभाग खात्याचे ते राज्यमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसातच त्यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, त्यांच्याकडे या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याचे बोलल्या जाते. सहा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी डॉ. फुके यांच्याकडेच राहणार यात आता तिळमात्रही शंका राहिलेली नाही. फुके भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री झाल्याचे वृत्त धडकताच दोन्ही जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.