मागेल त्याला शेततळे योजनेला फुलस्टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:19+5:302021-05-19T04:30:19+5:30
गोंदिया : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने विविध योजनांच्या अर्थसंकल्पीय निधीला कात्री लावली आहे. ...
गोंदिया : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने विविध योजनांच्या अर्थसंकल्पीय निधीला कात्री लावली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांसाठी असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला बसला आहे. नवीन कामांना मंजुरी न देण्याचे आदेश कृषी विभागांना दिल्याने सदर योजना समोर आदेश जारी येईपर्यंत फुलस्टॉप लागला आहे.
राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाच्या सचिवांनी सूचना दिल्यानंतर कृषी आयुक्तालय पुणे यांनी कृषी विभागाला आदेश निर्गमित केले आहे. युती शासनाच्या काळात सुरू झालेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यांमध्ये मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला होता. शेतकऱ्यांसाठी दरवर्षी लक्षांक प्राप्त झाल्यानंतर अर्ज प्राप्त होताच सोडत काढण्यात येत होती. त्यातून निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी लाभ मिळतो. कमी प्रमाणात निधी मिळणार असल्याने कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश देऊ नये, नवीन कामे सुरू करू नये तसेच नवीन कामासाठी आखणी करू नये, असे जिल्ह्यातील कृषी विभागांना बजावण्यात आले आहे. त्यामुळे यंदा नवीन शेततळी होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवले. अनेकांना लाभ घेता आला.