विकासकामांसाठी केंद्रातून निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:40 PM2018-02-11T21:40:39+5:302018-02-11T21:41:07+5:30
शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी तसेच शहरात विकासकामे व्हावीत यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी तसेच शहरात विकासकामे व्हावीत यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली. यासाठी त्यांनी केंदीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
नगराध्यक्ष इंगळे यांनी, नामदार गडकरी यांना या भेटीत शहरातील लोकसंख्या सुमारे तीन लाखांच्या घरात असून शहरातील रस्त्यांच्या आजच्या स्थितीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. यातून अपघातांचे प्रमाण वाढले असून शहरवासी त्रस्त आहेत.
याकरिता शहरातील रस्त्यांची कामे करणे अत्यावश्यक असून सोबतच अन्य विकासकामांची गरज आहे. यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच शहरातील विविध समस्या मांडत त्यांनी नामदार गडकरी यांना आवश्यक त्या कामांचे प्राथमिक अंदाजपत्रक संबंधीत विभागांकडून मागवून आर्थिक नियोजन करून सीआरएफ अंतर्गत या कामांना मंजूरी देण्याचीही मागणी केली.
यावर नामदार गडकरी यांनी, सर्व कामांची आवश्यकता लक्षात घेत याच आर्थिक वर्षात यांना पूर्ण करण्यासाठी मंजूरी दिली.
निवेदनात या कामांचा समावेश
नगराध्यक्ष इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात, ग्राम कटंगी ते फुलचूर नाका पर्यंत उड्डाणपूल व रस्त्यांचे सिमेंटीकरण, मरारटोली रेल्वे चौकी ते बायपास पर्यंत उड्डाणपूल, हड्डीटोली रेल्वे चौकी ते मरार समाजभवन पर्यंत उड्डाणपूल, भिमनगर मैदान जवळ रेल्वे चौकीवर अंडरग्राऊंड किंवा उड्डाणपूल, दुर्गा चौक ते मालधक्का-राजलक्ष्मी चौक पर्यंत लहान पूल, रानीसती लॉज येथून पायदळ पूल, कस्तूर हॉटेल जवळून रेल्वे क्रॉसिंगहून पायदळ रस्ता, कालेखा चौक ते बंगाली शाळा- गुजराती शाळा-पाल चौक पर्यंत रस्ता रूंदीकरण व सौंदर्यीकरण, कुडवा नाका ते बालाघाट रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम व सौंदर्यीकरणाचा समावेश आहे.