जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास निधीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:45+5:30

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले आहे.

Funding hinders demolition of dilapidated flyovers | जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास निधीचा अडसर

जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास निधीचा अडसर

Next
ठळक मुद्देतीन वर्षांपासून प्रक्रिया सुरू : सहा महिन्यात पाडायचा होता जीर्ण उड्डाणपूल,

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो सहा महिन्यात पाडण्यात यावा, असे पत्र रेल्वे विभागाने तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र अद्यापही जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली नसून आता हा पूल पाडण्यासाठी निधीचा अडसर असल्याची माहिती आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद केली. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन वाहतूक करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नागपूर येथील एका संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले होते.
त्यात हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी शासनास्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाला याला मंजुरी दिली. मात्र उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने रेल्वे विभागाची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आठवडाभरापूर्वीच रेल्वेने जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली आहे. तसेच यासाठी कोणत्या तांत्रिक बांबीची काळजी घ्यायची याचा इस्टीमेट प्लान देखील तयार करुन दिला. यासाठी ५२ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला रेल्वे विभागाकडे जमा करायचा आहे. त्यानंतर निविदा काढून जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाकडून हा निधी प्राप्त होताच या कामाला गती येणार आहे. मात्र आता शासनाकडून निधी मिळण्यास किती काळ लागतो यावर ही सर्व प्रक्रिया अवलंबून आहे.

पुलामुळे धोका कायम
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे.या पुलाचा बराच भाग खचत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पूल खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या पुलामुळे धोका कायम आहे.

उड्डाणपूल पाडण्यासाठी मुंबई येथील एजन्सींची निवड
शहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया ही फारच किचकट आहे. यासाठी अनुभवी एजन्सींची गरज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील एका एजन्सींची निवड केली आहे. मात्र यासाठी निविदा प्रक्रिया करुन पुढील काम सुरू केले जाणार आहे.
 

Web Title: Funding hinders demolition of dilapidated flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.