प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य सुविधांसाठी एक कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:39+5:302021-04-20T04:30:39+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याला वेळीच पायबंद घालण्यासाठी आरोग्यविषयक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याला वेळीच पायबंद घालण्यासाठी आरोग्यविषयक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची उपचाराअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यविषयक सुविधांसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केली आहे.
आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून हा निधी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक सोयीसुविधांचे बळकटीकरण करून ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. या सर्व परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून, ते वेळोवेळी मदत उपलब्ध करून देत आहेत. नुकतेच त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. तसेच आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात राहून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. याच अनुषंगाने आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी खा. पटेल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आरोग्य सुविधेसाठी स्थानिक विकास आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा सोमवारी केली. यामुळे आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे.