शोकाकुल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:28 PM2018-08-20T23:28:49+5:302018-08-20T23:29:39+5:30
लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील गांगुलपारा या पर्यटनस्थळी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार तरूणांवर सोमवारी (दि.२०) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील गांगुलपारा या पर्यटनस्थळी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार तरूणांवर सोमवारी (दि.२०) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील चार तरूणांना काळाने हिरावून नेल्याने गावात स्मशान शांतता होती. तर चौघांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसमुदाय लोटल्याचे चित्र होते.
जवळील ग्राम कटंगी येथील दीपक नेवारे, दुर्गेश घोसे, आशिष राठोड व विल्सन मदारे (सर्व रा.कटंगी) हे चार मित्र शनिवारी (दि.१८) गांगुलपारा येथे पिकनिकसाठी गेले होते. धबधब्याखाली आंघोळ करीत असताना अचानकच आलेल्या पुराच्या लाटेमुळे ते पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यु झाला. चारही तरूण घरी न परतल्याने रविवारी (दि.१९) त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथे गेले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर लगेच त्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले असता दुर्गेश घोसे, आशिष राठोड व विल्सन मदारे या तिघांचा मृतदेह रविवारीच मिळाला. तर दीपक नेवारे याचा मृतदेह सोमवारी (दि.२०) सकाळी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे चौघांच्या मृतदेहांची बालाघाट येथे सोमवारी उत्तरीय तपासणी करून त्यांचे मृतदेह कटंगी येथे आणण्यात आले. सोमवारी (दि.२०) दुपारी दुर्गेश, आशिष व दीपक यांच्या मृतदेहावर टेमनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विल्सनवर दफनविधी करण्यात आल्याची माहिती आहे.
गावात फक्त एकच चर्चा
गावातील चार तरूणांचा अचानकच जीव गेल्याने कटंगीत सर्वांच्या तोडांत फक्त एकच याच घटनेचा विषय होता. त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील सर्वांनीच हजेरी लावली, त्यामुळे गावात शुकशुकाट होता. चौघांच्या मृत्युमुळे गावकऱ्यांनाही एकच धक्का बसला व त्यांनी या दुखात सहभागी होत व्यापारपेठ बंद ठेवली होती.