भूमिगत गटार योजनेवरुन सर्वसाधरण सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:49 PM2018-07-25T21:49:16+5:302018-07-25T21:49:49+5:30
शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत यावरुन अध्यक्षांना जाब विचारला. त्यामुळे सभेत काही वेळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान सदस्य आक्रमक झाल्याने अध्यक्षांनी आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.
१८ जुलैला तहकुब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत मागील सभेतील विषय ठेवण्यात आले होते. सभेला सुरुवात होवून ठेवण्यात आलेले विषय वाचून दाखविण्यात आले. मात्र यात केवळ चारच विषय ठेवण्यात आले होते. यातून भूमिगत गटार योजनेचा पाचवा विषय वगळण्यात आला होता. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत भूमिगत गटार योजनेचा विषय का वगळण्यात आला. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना नगराध्यक्षांना हा विषय महत्त्वाचा वाटत नाही का, शहरातील सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत नसल्याने थोडासाही पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तातडीने भूमिगत गटार योजनेचा विषय मार्गी लावण्याची गरज होती. मात्र नगराध्यक्षांना याचे गांर्भिय नसल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाचे सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सदस्यांची आक्रमकता पाहता अध्यक्षांनी पुन्हा आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदस्य शांत झाले. त्यानंतर काही सदस्यांनी मागील सभा का तहकूब करण्यात आली, त्यामागील नेमके कारण असा प्रश्न उपस्थित करुन अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभेत मागील विषयांवर चर्चा करण्यात आली.
भीमघाटाला तीर्थस्थळाचा दर्जा
शहरातील भीम घाट परिसराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात यावा. हा विषय अध्यक्षांच्या सहमतीने सदस्य विनित शहारे यांनी ठेवला. त्यानंतर सभागृहाने एकमताने भीमघाटला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचा ठरावाला एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
सभेकरिता चोख पोलीस बंदोबस्त
बुधवारी आयोजित नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मागील सभेत काही भाजपाचे सदस्य सुध्दा आक्रमक झाले होते. तर विरोधक सुध्दा आक्रमक होण्याची शक्यता लक्षात सभेदरम्यान नगर परिषदेत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.