‘जय झुलेलाल’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:02 PM2018-03-19T22:02:33+5:302018-03-19T22:02:33+5:30
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती. सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती.
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस सिंधी समाजबांधव मोठ्या धडाक्यात साजरा करतात. निमित्त शहरात सिंधी समाजाकडून शोभायात्रा काढली जाते. हजारोंच्या संख्येत सिंधीबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील आकर्षक झाकींनी मन मोहून घेतले होते. सिंधी कॉलनीतून ढोल ताशांच्या गजरात व नाचत गात निघालेली ही शोभायात्रा शहरातील गांधी प्रतिमा, सिव्हील लाईन्स व बाजार परिसर होत मुख्य मार्गाने गेली. शोभायात्रेत ‘आयो लाल झुलेलाल’चा गजर करीत सिंधीबांधवांनी एकमेकांना साई झुलेलाल यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या शोभायात्रेत एका रथामध्ये ज्योत ठेवण्यात आली होती व तो रथ सिंधी समाजबांधव ओढत होते. ही ज्योत म्हणजेच ‘बहराणा साहब’ असून या ज्योतचेच सर्वाधीक महत्व राहत असल्याने सर्व सिंधी बांधव ज्योतचे दर्शन घेत होते.
चौकाचौकात खाद्यपदार्थ व पेयांची व्यवस्था
शहरात सिंधी समाजबांधवांची मोठी संख्या असून त्यांच्या आद्य दैवतांचा जयंती दिवस असल्याने शोभायात्रेत सहभागी बांधवांसाठी शहरातील चौकाचौकांत विविध खाद्यपदार्थांसह पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येत सिंधी बांधवांसह अन्य बांधव या खाद्यपदार्थ व पेयांचा आस्वाद घेताना दिसले.
बाजारपेठेत शुकशुकाट
बाजारपेठेतील सुमारे ७० टक्के व्यापार सिंधी समाजातील आहेत. झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी नवयुवक सेवा मंडळाकडून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील समस्त सिंधी बांधवांनी सोमवारी (दि.१९) आपले प्रतिष्ठान बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.